मुंबई,
Tukaram Mundhe बनावट वैश्विक अपंग ओळखपत्र (यूडीआयडी) वापरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवास सवलतींचा गैरवापर करणाऱ्या प्रवाशांविरोधात राज्यभर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींविरोधात थेट गुन्हा दाखल करून बनावट ओळखपत्र जप्त करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात उघडकीस आलेल्या बनावट अपंग ओळखपत्र प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कठोर कारवाई होणार
दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांना पत्र पाठवून कठोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. बनावट यूडीआयडीच्या आधारे एसटी प्रवास सवलती घेतल्याचे आढळून आल्यास, संबंधित व्यक्तीविरोधात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना या पत्रात देण्यात आल्या आहेत. तसेच बनावट ओळखपत्र तत्काळ जप्त करून त्याची सविस्तर माहिती दिव्यांग कल्याण विभागाला कळवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात बनावट अपंग ओळखपत्रांचे प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरातील वैद्यकीय प्रमाणपत्रे आणि यूडीआयडीची तपासणी व पडताळणी अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 आणि शासनाच्या विविध निर्णयांनुसार एसटी महामंडळाकडून दिव्यांग प्रवाशांना प्रवास सवलती दिल्या जातात. या सवलतींचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने, केवळ पात्र दिव्यांग व्यक्तींनाच हा लाभ मिळावा आणि गैरवापराला आळा बसावा, यासाठी तपासणी प्रक्रिया अधिक प्रभावी करणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर एसटी Tukaram Mundhe महामंडळाने यूडीआयडीची पडताळणी करण्यासाठी तांत्रिक यंत्रणा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. वाहक, तिकीट तपासनीस आणि मार्ग तपासणी कर्मचारी यांनी यूडीआयडी विभागाचे अधिकृत मोबाइल ॲप वापरून प्रवाशांच्या ओळखपत्रांची तपासणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. या ॲपमध्ये प्रवाशाचा यूडीआयडी क्रमांक आणि जन्मतारीख नोंदवून ओळखपत्राची वैधता तात्काळ तपासली जाणार आहे.
लाभ दिला जाईल
तपासणीत यूडीआयडी वैध आढळल्यास संबंधित प्रवाशाला नियमानुसार प्रवास सवलतीचा लाभ दिला जाईल. मात्र ओळखपत्र बनावट असल्याचे सिद्ध झाल्यास, संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून ओळखपत्र जप्त करण्यात येईल आणि ते संबंधित आगारात जमा करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे.या निर्णयानुसार एसटी महामंडळाच्या वाहतूक खात्याच्या महाव्यवस्थापकांनी सर्व प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रकांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. एसटीतील सर्व वाहक, पर्यवेक्षक आणि तपासणी कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर असताना प्रत्येक दिव्यांग प्रवाशाची यूडीआयडीद्वारे पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.एकूणच, बनावट यूडीआयडीच्या आधारे सवलती लाटणाऱ्यांवर कडक कारवाई करून पात्र दिव्यांग व्यक्तींचे हक्क सुरक्षित ठेवण्याचा सरकारचा हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे स्पष्ट होत आहे.