नवी दिल्ली,
Lieutenant Colonel Sita Ashok Shelke, वायनाडमधील नैसर्गिक आपत्तीत नागरिकांची सुखरूप सुटका केल्याबद्दल महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या कन्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना भारत सरकारकडून ‘सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार २०२६’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराद्वारे नैसर्गिक संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्यांचा सन्मान केला जातो.
सरकारने शुक्रवारी या पुरस्काराची घोषणा केली. देशभरातून आलेल्या २७१ नामांकनांतून लेफ्टनंट कर्नल शेळके यांची वैयक्तिक श्रेणीत निवड करण्यात आली. शेळके मूळ अहिल्यानगर जिल्ह्यातील गाडीलगावच्या रहिवासी आहेत. त्यांनी अहिल्यानगरमधूनच मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आणि २०१२ मध्ये चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधून प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाल्या.
लेफ्टनंट कर्नल शेळके यांना २०२४ मध्ये केरळच्या वायनाडमधील भीषण भूस्खलनाच्या घटनेत बचावकार्यासाठी तैनात करण्यात आले होते. अत्यंत प्रतिकूल हवामानात त्यांनी शेकडो नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी बचाव मोहिमेचे नेतृत्व केले. विशेषतः चूरलमाला येथे १९० फूट लांबीच्या बेली ब्रिजची विक्रमी वेळेत उभारणी करून दुर्गम भागातील गावांशी संपर्क साधला.शेळके यांनी कोमात्सु पीसी २१० एक्सकॅव्हेटरचा सर्जनशील वापर करून अवघ्या चार तासांत तात्पुरता पादचारी पूल तयार केला, ज्यामुळे संकटग्रस्त भागातील नागरिकांची सुटका करण्यास मदत झाली.