पुणे,
ZP–Panchayat Samiti Pune district जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, गेल्या दोन दिवसांत एकूण ५८ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस मंगळवार (दि. २७) असल्याने उमेदवारांकडे आता केवळ एकच दिवस शिल्लक राहिला आहे. रविवारी व सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे माघारीसाठी उपलब्ध वेळ मर्यादित झाला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आतापर्यंत २२ उमेदवारांनी, तर पंचायत समितीसाठी ३६ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. जिल्हा परिषदेच्या ७३ गणांसाठी एकूण ६२१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी काही माघारीनंतर आता ५९८ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत. पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी १ हजार १२२ उमेदवारांनी अर्ज भरले होते, त्यातील माघारीनंतर सध्या १ हजार ८६ उमेदवार रिंगणात आहेत.दौंड तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या सात गणांसाठी ९५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी आतापर्यंत ११ उमेदवारांनी माघार घेतली आहे. भोर तालुक्यातून जिल्हा परिषदेसाठी तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत.
पंचायत समितीच्या निवडणुकीतही काही प्रमाणात माघारी नोंदवण्यात आल्या आहेत. दौंड तालुक्यातील १४ गणांसाठी १२७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी ११ जणांनी अर्ज माघारी घेतले आहेत. इंदापूर तालुक्यातून पंचायत समितीसाठी २०६ उमेदवारांनी अर्ज भरले असून, त्यातील ११ उमेदवारांनी माघार घेतली आहे.आज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने अनेक ठिकाणी राजकीय हालचालींना वेग आला असून, पक्षांतर्गत समन्वय आणि आघाड्यांच्या चर्चांना अंतिम स्वरूप दिले जात आहे. माघारीनंतरच प्रत्येक गणातील खरी लढत स्पष्ट होणार असून निवडणुकीचे चित्र अधिक ठळक होणार आहे.
लक्ष लागले
उमेदवारांनी ZP–Panchayat Samiti Pune district मोठ्या प्रमाणावर अर्ज माघारी घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अनेक उमेदवारांनी अचानक माघार का घेतली, याबाबत चर्चा सुरू असून पक्षांतर्गत समन्वय, संभाव्य युती-आघाड्यांचे गणित किंवा ‘बी’ व ‘सी’ पर्यायांवर झालेली पडद्यामागील चर्चा यामागे कारणीभूत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही ठिकाणी पक्षांतर्गत हालचाली घडत नसूनही माघारी झाल्याने ‘ना घर के ना घाट के’ अशी अवस्था झालेल्या उमेदवारांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. माघारीचा आजचा शेवटचा दिवस लक्षात घेता आणखी काही अनपेक्षित निर्णय होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.