मुंबई,
Haq movie गेल्या काही दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर मोठमोठे बजेटचे चित्रपट प्रदर्शित होत असताना, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला ‘हक’ हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये वेगळे स्थान निर्माण करत आहे. 1985 मधील ऐतिहासिक शाह बानो प्रकरणावरून प्रेरणा घेऊन बनवलेले हे कोर्टरूम ड्रामा भारतातच नाही तर जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. यामी गौतमने साकारलेली शाजिया ही व्यक्तिरेखा एका मुस्लिम महिलेच्या न्यायासाठीच्या कायदेशीर आणि भावनिक संघर्षाचे प्रभावी चित्रण करते.
चित्रपटात मुस्लिम महिलांच्या भरण-पोषणाच्या अधिकारांवर, विवाहसंस्थेवर, तलाक प्रक्रियेवर आणि पितृसत्तात्मक मानसिकतेवर नेमकेपणाने भाष्य केले आहे. 2 जानेवारी २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘हक’ला फक्त काही आठवड्यांतच प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली. भारतातल्या यशानंतर, हा चित्रपट पाकिस्तान आणि नायजेरियामध्येही चर्चेचा विषय बनला.
सुपर्ण एस. वर्मा दिग्दर्शित ‘हक’ ला फक्त दुसऱ्या आठवड्यातच 4.5 मिलियन व्ह्यूज मिळाले असून, मोठ्या बजेटच्या आणि दीर्घकाळ चालणाऱ्या चित्रपटांशी स्पर्धा करताना ‘हक’ने आपली भक्कम ओळख सिद्ध केली आहे. आलिया भट्ट, कियारा अडवाणी, करण जोहर आणि फराह खान यांसारख्या बॉलिवूडच्या नावाजलेल्या कलाकारांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे कौतुक केले आहे. यामी गौतमनेही प्रेक्षकांचा प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक असल्याचे सांगितले आहे, तर दिग्दर्शक सुपर्ण वर्मा यांनी देश-विदेशातून सातत्याने येणाऱ्या भावनिक संदेशांचे स्वागत केले.
पाकिस्तानमध्ये देखील ‘हक’ने झपाट्याने लोकप्रियता मिळवली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर काहीच दिवसांत हा चित्रपट तिथल्या ट्रेंडिंग टॉप चार्टमध्ये पोहोचला. पाकिस्तानी अभिनेते, वकील, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि सामान्य प्रेक्षकांनी चित्रपटावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी यातील अभिनय, इस्लामिक कायदा, तलाक प्रक्रिया आणि महिलांचे अधिकार यांचे सादरीकरण अत्यंत प्रभावी असल्याचे मान्य केले आहे.पाकिस्तानी अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती फाजिला काझीने इंस्टाग्रामवर लिहिले की, “या चित्रपटाची भावनिक खोली खूप प्रेरणादायी आहे. हा चित्रपट मला अक्षरशः रडवून गेला. यामी गौतम… तुम्ही अप्रतिम आहात.” ‘हक’च्या माध्यमातून सामाजिक न्याय, महिला अधिकार आणि पारंपरिक संरचना यावर केलेले चित्रण प्रेक्षकांसमोर अत्यंत परिणामकारक ठरले आहे.