तभा वृत्तसेवा राळेगाव,
Vadki Gram Panchayat तालुक्यातील वडकी येथील ग्रामपंचायत स्थलांतरीतच्या प्रमुख मुद्दासह येथील भ्रष्टाचार तसेच गावातील अवैध मटका कायमस्वरूपी बंद व्हावा. यासाठी दि 22 जानेवारी गुरुवारपासून येथील ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालय वड़की समोर आमरण उपोषणास बसले आहेत.
वडकी ग्रामपंचायतचे स्थलांतर इतरत्र न करता बांधकाम जुन्याच जागेवर करण्यात यावे, 2011 च्या पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या अतिक्रमणधारकांना वाढीव गावठाण देण्यात यावे, वडकी येथे सुरू असलेल्या अवैध मटका जुगार यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील अवैध मटका जुगार तत्काळ बंद व्हावा, वडकी येथिल जलजीवन मिशनच्या निष्कृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, वडकी ग्रामपंचायतमध्ये भोंगळ कारभारामुळे आर्थिक व प्रशासकीय गैरव्यवहाराची आयुक्त स्तरावर उच्चस्तर चौकशी व्हावी, वडकी ते खैरी या पांदण रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित हटवून मातोश्री योजनेद्वारे पांदण रस्ता करावा या मागण्यांसाठी वडकी येथील हेमंत रामभाऊ कडू, सौरभ राजेंद्र इंगोले, अमित पुरुषोत्तम उताणे हे युवक गुरुवारी वडकी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
उपोषणाच्या दुसèया दिवशी उपोषणाची दखल घेत राळेगाव नायब तहसीलदार अरुण भगत, पंचायत समिती प्रभारी गटविकास अधिकारी भारती इसाळ, विस्तार अधिकारी मस्के यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्त्यांची चर्चा केली. मात्र समाधानाकारक तोडगा निघाला नसल्याने उपोषणकर्ते मागणीवर ठाम आहेत. समाधानकारक तोडगा न निघाल्यास हे उपोषण उग्ररूप धारण करण्याची शक्यता आहे.ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाबाबत अभियंता मुळे यांच्या तांत्रिक अहवालावरून जुनी इमारतीची जागा कमी पडत असल्यामुळे ग्रामपंचायत मासिक सभेने गट क्र. 4 क्षेत्र 1210 चौमी मधील ‘ओपन स्टेस’ मधील जागेची निवड केली आहे. उपोषणकर्त्यांच्या राहिलेल्या इतर मागण्यांसाठी वरिष्ठांचे आदेश येईल, त्याप्रमाणे आम्ही कारवाई करू.
- पंढरी खडसे, ग्रामसेवक