वर्धा,
Wardha District Libraries वाचाल तर वाचाल असे अनेकदा सांगितले जाते. वाचन संस्कृती कायम रहावी या हेतूने गाव पातळीवरही वाचनालये उभारण्यात आली आहे. शिवाय शासनाच्यावतीने वाचनालयांना अनुदानही दिले जाते. पण, जिल्ह्यातील काही वाचनालयांना घरघर लागल्याचे चित्र बघावयास मिळत असून गत तीन वर्षांत जिल्ह्यातील १० वाचनालये बंद झाली असून ८ बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत.

वाचन संस्कृती टिकावी, गाव खेड्यातील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना या वाचनालयांचा लाभ व्हावा म्हणून शासनाकडून निधी उपलब्ध करून दिल्या जाते. शासनाकडून मिळालेल्या अनुदानातून वाचकांना नवनवीन पुस्तके उपलब्ध करून दिल्या जाते. वाचनालयाच्या दर्जानुसार शासनाच्यावतीने अनुदान दिले जाते. ४ लाख ४० हजार ते ४८ हजार असे हे अनुदान शासनाच्या वतीने वाचनालयांना दिल्या जाते. अ वर्ग वाचनालयाला ४ ते ४.५० लाख रुपये, ब वर्ग वाचनालयाला २.५० ते ३ लाख रुपये, क वर्ग वाचनालयास ५० हजार आणि ड वर्ग वाचनालयाला ४८ हजारांचे अनुदान दिल्या जाते. प्रामुख्याने या निधीचा वापर नवनवीन पुस्तके खरेदी, वर्तमानपत्रे लावणे, विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अपेक्षित आहे. पण, अनेकजण केवळ शासकीय अनुदान लाटण्यासाठी वाचनालये कागदावर दाखवितात. परिणामी, जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून वाचनालयांची तपासणी करण्याची गरज व्यत केली जात आहे.
जिल्ह्यात ११४ वाचनालयांची नोंदणी करण्यात आली होती. सलग तीन वर्षाचे निकष पूर्ण न करणारी १० वाचनालये बंद करण्यात आली आहे. शिवाय आठ वाचनालयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. एकूणच जिल्ह्यात सध्या १०४ वाचनालये असल्याचे सांगण्यात आले. दरवर्षी वाचनालयांची तपासणी एलजीएमएस समितीकडून केली जाते. या तपासणीत प्रामुख्याने सलग तीन वर्षांचा निकष पूर्ण न करणार्या वाचनालयाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचेही पुढे आले आहे.
सध्या वर्धा जिल्ह्यात १०४ वाचनालय आहेत. त्यापैकी आर्वी तालुयात ९, आष्टी ७, कारंजा (घा.) ५, देवळी १७, वर्धा ३१, समुद्रपूर ४, सेलू १२ आणि हिंगणघाट तालुयात १९ वाचनालय असल्याची नोंद आहे.