पुणे,
double-murder : पुणे जिल्ह्यात मजुरीसाठी एकत्र काम करणाऱ्या महिलेसोबतच्या एकतर्फी प्रेमातून एका सराईत गुन्हेगाराने दोन जणांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जैतू चिंधू बोरकर (वय ४३, रा. कोयंडे, ता. खेड) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर यापूर्वीही चार खुनांचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.
सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळखैरेवाडी (ता. बारामती) येथे १९ जानेवारी रोजी सकाळी एका महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. तिच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. या खुनाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखा आणि सुपा पोलिसांनी घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. घटनास्थळी सापडलेल्या एका डायरीच्या आधारे संशय अधिक बळावला.
तपासादरम्यान लालासाहेब मारुती जाधव यांच्याकडे चौकशी करण्यात आली असता, त्यांनी फुटेजमधील व्यक्ती जैतू बोरकर असल्याचे ओळखले. त्यानंतर पोलिसांनी खेड परिसरातून जैतू बोरकरला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने रंजना अरुण वाघमारे (वय ३५, रा. खांडपे, ता. कर्जत, जि. रायगड) हिच्यावर एकतर्फी प्रेम असल्याची कबुली दिली.
रंजना हिला जबरदस्तीने आपल्या सोबत राहण्याचा दबाव तो टाकत होता. तिने नकार दिल्याने आणि पोलिसांकडे तक्रार करेल या भीतीने आरोपीने तिचा खून केला. त्याआधी १७ जानेवारी रोजी रात्री कोयंडे गावातील चोर्याचा डोंगर परिसरात सूरज अंकुश वाघ (वय ३०, रा. वांगणी, ता. बदलापूर, जि. ठाणे) याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याचेही तपासात उघड झाले आहे.
जैतू बोरकर याच्यावर २००७ आणि २०१८ मध्ये प्रत्येकी एक तर २०२६ मध्ये दोन असे एकूण चार खुनांचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सूरज वाघ यांच्या खुनाप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू आहे.