ब्लॅक बॉक्स सुरक्षित; अजित पवार विमान अपघाताबाबत DGCA चे महत्त्वाचे खुलासे

29 Jan 2026 19:52:46
बारामती,
Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या दुर्दैवी निधनानंतर बारामती येथे घडलेल्या या भीषण घटनेबाबत तपासाला वेग आला आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्राला उत्तर देत अपघातासंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे. मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की विमानाचा ब्लॅक बॉक्स सुरक्षितपणे सापडला असून तो तपासासाठी जतन करून ठेवण्यात आला आहे. अपघातस्थळावरून मिळालेली सर्व तांत्रिक नोंदी, उड्डाणाशी संबंधित माहिती आणि इतर तथ्यांची सखोल तपासणी सुरू असून, यामधून अपघात नेमका कसा आणि कोणत्या कारणामुळे घडला, हे स्पष्ट होण्यास मदत मिळणार आहे.
 
 

AJIT PAWAR 
 
 
नागरी उड्डयन मंत्रालयाने सांगितले की विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) यांनी या दुर्घटनेची औपचारिक चौकशी सुरू केली असून ही चौकशी पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि वेळेत पूर्ण केली जाईल. भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या विनंतीकडेही गांभीर्याने लक्ष दिले जात असल्याचे मंत्रालयाने नमूद केले आहे.
 
ब्लॅक बॉक्स हा विमानातील अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. वर्ल्ड एव्हिएशन फ्लाइट अकॅडमीनुसार, उड्डाणादरम्यान घडणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचा डेटा साठवण्यासाठी तो तयार करण्यात आलेला असतो आणि विमान अपघाताच्या तपासात तो सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो.
 
बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या लिअरजेट 45 विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, पायलट-इन-कमांड कॅप्टन सुमित कपूर, फर्स्ट ऑफिसर कॅप्टन शंभावी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचा मृत्यू झाला.
 
दरम्यान, नागरी उड्डयन मंत्रालय आणि DGCA कडून अपघाताच्या अगदी शेवटच्या क्षणांबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार, अपघात होण्यापूर्वी विमानातील चालक दल आणि जमिनीवरील हवाई वाहतूक नियंत्रण केंद्र (ATC) यांच्यात संवाद झाला होता. विमानाने बारामती येथे दोन वेळा लँडिंग करण्याचा प्रयत्न केला होता. बारामती हे ‘अनकंट्रोल्ड’ विमानतळ असून, याठिकाणी दोन स्थानिक फ्लाइंग स्कूल्समधील पायलट कॅडेट्स आळीपाळीने एटीसीचे काम पाहत असल्याचे यापूर्वीच्या माध्यमांच्या अहवालात नमूद करण्यात आले होते.
 
मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला पायलटांनी रनवे दिसत नसल्याचे सांगितले होते. मात्र काही वेळानंतर रनवे दिसत असल्याची पुष्टी करण्यात आली आणि त्यानंतर विमानाला लँडिंगची परवानगी देण्यात आली. सकाळी 8 वाजून 43 मिनिटांनी लँडिंगची मंजुरी देण्यात आली होती आणि अवघ्या एका मिनिटातच एटीसी कर्मचाऱ्यांनी विमान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याचे पाहिले.
 
DGCA सूत्रांच्या माहितीनुसार, बारामती विमान अपघाताच्या चौकशीचा मुख्य केंद्रबिंदू हा कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीत लँडिंग करण्याचा निर्णय का घेण्यात आला, यावर आहे. उड्डाण सुरू होताना दृश्यमानता 3 ते 5 किलोमीटर दरम्यान असल्याची माहिती समोर आली असून, याच मुद्द्यावर सखोल तपास केला जात आहे.
Powered By Sangraha 9.0