पराक्रमाची पताका

    दिनांक :29-Jan-2026
Total Views |
वेध...
 
 
नंदकिशोर काथवटे
gadchiroli police प्रजासत्ताक दिन हा केवळ सोहळ्यांचा किंवा औपचारिक सन्मानांचा दिवस नसून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी प्राणपणाने लढणाऱ्या शूर जवानांच्या त्यागाची आठवण करून देणारा दिवस आहे. याच पृष्ठभूमीवर यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलिस दलाने मिळवलेला सन्मान हा केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी गौरवाचा विषय ठरतो. देशभरात जाहीर झालेल्या 121 पोलिस शौर्यपदकांपैकी तब्बल 31 शौर्यपदके गडचिरोली पोलिस दलाला मिळाली असून, त्यामुळे गडचिरोलीने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. नक्षलवादग्रस्त म्हणून देशभरात ओळखल्या जाणाèया गडचिरोली जिल्ह्याने आज आपल्या ओळखीचा इतिहास बदलला आहे. कधीकाळी भीती, बंदूक आणि स्फोटांची छाया असलेला हा जिल्हा आज शौर्य, नियोजन आणि पोलिस दलाच्या शिस्तबद्ध कारवाईमुळे देशाच्या पटलावर सकारात्मक उदाहरण म्हणून उभा राहिला आहे.
 
 
 
गडचिरोली
 
22 एप्रिल 2018 रोजी बोरीया-कसनसूर येथे झालेल्या ऐतिहासिक चकमकीत 40 माओवाद्यांना ठार मारण्यात गडचिरोली पोलिसांना मिळालेले यश हे केवळ एक लष्करी यश नव्हते, तर नक्षल चळवळीच्या कणाकणावर घाव घालणारी निर्णायक कारवाई होती. या चकमकीत सहभागी असलेल्या पोलिस अधिकारी व जवानांनी दाखवलेले धैर्य, प्रसंगावधान आणि बलिदान आज शौर्यपदकांच्या रूपाने गौरवले जात आहे. पोलिस निरीक्षक अमोल फडतरे, सहायक उपनिरीक्षक वासुदेव मडावी, मधुकर नैताम, पोलिस नाईक संतोष नैताम, विश्वनाथ सडमेक, बिटाजी वेलाडी, करे उरपा आत्राम यांच्यासह अनेक जवानांनी जीव धोक्यात घालून देशाच्या सुरक्षेसाठी लढा दिला. काही जवानांनी तर आपले प्राण अर्पण करून कर्तव्याची सर्वोच्च पातळी गाठली. त्यांच्या बलिदानामुळेच आज गडचिरोलीचा चेहरा बदलताना दिसतो आहे. या शौर्याच्या जोडीला गडचिरोली पोलिस दलात झालेल्या 394 पदोन्नती हा देखील तितकाच महत्त्वाचा टप्पा आहे. वेगवर्धित पदोन्नती, तसेच हुतात्मा पोलिस जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात आलेल्या पदोन्नती या निर्णयातून शासन आणि प्रशासनाचा संवेदनशील दृष्टिकोन दिसून येतो. केवळ शौर्यालाच नव्हे, तर प्रामाणिक सेवेची दखल घेणारी ही प्रक्रिया पोलिस दलाचे मनोबल वाढवणारी आहे. महत्त्वाचे म्हणजे गडचिरोली पोलिसांनी नक्षलवादाविरोधातील लढा केवळ बंदुकीच्या जोरावर लढलेला नाही. सोशल पोलिसिंगच्या माध्यमातून आदिवासी समाजात विश्वास निर्माण करणे, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि नक्षल चळवळीची वैचारिक मुळे कमकुवत करणे, हा या लढ्याचा खरा पाया ठरला आहे. पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सी-60 पथकाने अतिदुर्गम व नक्षलप्रभावित भागात पोलिस चौक्या उभारून नक्षल्यांची मुस्कटदाबी केली. बिना गुंडा परिसरात उभारलेली पोलिस चौकी ही केवळ प्रशासकीय रचना नसून, राज्याच्या उपस्थितीचे आणि सुरक्षेच्या विश्वासाचे प्रतीक आहे. गडचिरोली पोलिसांच्या या कामगिरीकडे केवळ शौर्यपदकांच्या आकड्यांतून पाहणे ही मोठी चूक ठरेल. कारण हा लढा बंदुकीपेक्षा जास्त विश्वासाचा, संयमाचा आणि सातत्याचा आहे. नक्षलवादाला रोखताना पोलिसांनी केवळ हिंसाचाराचे उत्तर हिंसाचाराने दिले नाही, तर विकास, सुरक्षा आणि संवाद या तीन पायांवर उभी राहणारी नवी व्यवस्था निर्माण केली. आज गडचिरोलीत उभा राहत असलेला शांततेचा नवा अध्याय हा सहज घडलेला नसून, तो पोलिस जवानांच्या घाम, रक्त आणि बलिदानातून घडलेला आहे. म्हणूनच हा पराक्रम सन्मानापुरता न ठेवता, तो धोरणांचा भाग बनवणे हीच खरी राष्ट्रसेवा ठरेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2026 पर्यंत संपूर्ण देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प जाहीर केला आहे. त्या संकल्पाच्या दिशेने गडचिरोली पोलिसांनी उचललेली पावले आज प्रत्यक्षात परिणाम देताना दिसत आहेत. नक्षलवादाच्या अंधारातून बाहेर पडत असलेला गडचिरोली जिल्हा हा देशातील इतर नक्षलप्रभावित भागांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. प्रजासत्ताक दिनी मिळालेली ही शौर्यपदके केवळ सन्मानचिन्ह नाहीत, तर गडचिरोली पोलिसांच्या रक्त, घाम आणि बलिदानाची पावती आहेत.gadchiroli police देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी लढणाèया या शूर जवानांना सलाम करताना, त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही समाजाची आणि शासनाचीही जबाबदारी आहे. गडचिरोली पोलिसांचा हा पराक्रम संपूर्ण देशासाठी निश्चितच गौरवाचा, प्रेरणादायी आणि इतिहास घडवणारा क्षण आहे. गडचिरोली पोलिस दलाने मिळवलेले यश हे केवळ एका कारवाईपुरते मर्यादित नाही, तर दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाचे फलित आहे. दुर्गम जंगल, अवघड भौगोलिक परिस्थिती आणि सततचा जीवघेणा धोका असूनही पोलिस जवानांनी कर्तव्याशी तडजोड केली नाही. शासन, प्रशासन आणि स्थानिक नागरिक यांच्यातील समन्वयातून उभा राहिलेला हा विश्वासाचा पूल नक्षलवादाच्या विरोधातील लढ्यात निर्णायक ठरत आहे. गडचिरोलीचा हा अनुभव देशातील इतर नक्षलप्रभावित भागांसाठी दिशादर्शक ठरू शकतो.
 
9922999588