अघटिताचा आघात!

    दिनांक :29-Jan-2026
Total Views |
 
अग्रलेख
ajit pawar राजकारणाचे क्षेत्र बरेच वादग्रस्त असले तरी या क्षेत्रातील काही व्यक्ती कोणत्या तरी ध्यासाने, ध्येयाने प्रेरित होऊन त्याच्या पूर्ततेसाठी सतत धडपडत असतात. अजित पवार हे राजकारणाच्या पटलावरील त्यापैकीच एक नाव. त्यांच्या दुर्दैवी अस्ताच्या आकस्मिक व धक्कादायक बातमीने महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात अनामिक पोकळीच्या दुःखद जाणिवा तयार झाल्या आहेत. ही पोकळी केवळ एका नेत्याच्या जाण्याच्या वेदनादायी जाणिवेची नाही, तर ती एका आक्रमक, धाडसी, कधी-कधी उद्धट वाटणाऱ्या, पण कायम प्रभावशाली राहिलेल्या राजकीय पर्वाच्या समाप्तीची आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून राज्याच्या सत्ताकारणावर आपल्या अस्तित्वाची अमिट मोहर उमटविणारे अजित पवार यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाचे सर्वांना झालेले दुःख फार बोचरे आहे. नियतीचा खेळ अनाकलनीय असतो असे म्हणतात. त्यापुढे कोणाचेच काही चालत नाही हेही खरेच असते, पण ज्यांच्या असण्याने असंख्यांचे जगणे सोपे होणार असते, ज्यांच्या अस्तित्वामुळे प्रगतीच्या दिशा उजळणार असतात, त्यांनाच काळाच्या पडद्याआड ओढून नियतीने दाखविलेली अनाकलनीयता मात्र क्रूरच ठरते.
 
 
 

अजित पवार  
 
 
अजित पवार म्हणजे सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्याची दुर्दम्य आकांक्षा! निर्णयांतील वेग, भाषणातील धार, प्रशासकीय कामकाजावरील पकड आणि प्रसंगी राजकीय संकेत झुगारून, कागदावरच्या नियमांना बगल देऊन केलेली थेट कृती ही त्यांची कार्यशैली महाराष्ट्राला कायमच भावली. त्यामुळेच ते नेहमीच चर्चेत राहिले. ही चर्चा अनेकदा उलटसुलटदेखील होती. त्यांच्या कृतिशील स्वभावामुळे जेव्हा राज्याच्या हिताचे प्रश्न सहजपणे सोडविले गेले, तेव्हा ते कौतुकाचे धनी ठरले आणि कधी त्यांच्या काही निर्णयांवर टीकेचे प्रहारही झाले. स्वभावाने सच्चा असलेल्या या नेत्याने कधीही ‘लोकानुनय’ केला नाही. रोखठोक स्वभाव, परखड भाषा आणि अप्रिय असले तरी सत्य बोलण्याचा धाडसी स्वभाव असलेला हा नेता सत्तानिष्ठ होता. सत्तेशिवाय समाजाचे हित साधताच येणार नाही, अशा ठाम धारणेमुळेच असावे कदाचित, सातत्याने सत्तेच्या सहवासात राहण्यासाठी त्यांनी प्रसंगी वैचारिक भूमिका बदलल्या. अनेकदा त्यांनी पक्षीय धोरणांना बगल दिली आणि थेट वारसादेखील नाकारण्याचे धाडस दाखविले. स्वतंत्र मार्गावरून चालत राजकारण करण्याची हिंमतही दाखविली. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता ही केवळ पदाने नव्हे, तर प्रभावाने मोजली जाते, हे त्यांनी पुन्हा पुन्हा सिद्ध केले.
 
नेतृत्वाच्या संधी हिरावल्या जात असल्याचे खदखदते शल्य उराशी जपून ठेवणे एका टप्प्यावर अवघड झाले, तेव्हा शरद पवारांच्या राजकीय संस्कारांची सावली झुगारून त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय अजितदादांसाठी सोपा नव्हता. भविष्यातील प्रवासात कोणते अडथळे असतील, कोणत्या संधी असतील आणि कोणत्या अडथळ्यांवर मात करून कोणत्या संधीचे सोने करता येईल, याबाबत कोणतीच निश्चिततादेखील नव्हती. शरद पवारांच्या सावलीतच राहण्यासाठी असंख्य राजकीय नेते धडपडत असतानाच्या काळात, आता आम्ही स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या क्षमतेचे झालो आहोत, असे ठणकावून सांगत स्वतःची वाट आखू पाहणारे अजित पवार हे वेगळे रसायन आहे, याची जाणीव महाराष्ट्राला झाली. शरद पवारांचे नेतृत्व झुगारण्यासाठी अगोदर कोणत्याही नेत्यास आपल्या नेतृत्वाचे वेगळे वलय निर्माण करावे लागते, असा तो काळ. अन्यथा, अनेक नेत्यांना सहजपणे कात्रजचा घाट दाखविला जात असे. अशा काळात अजित पवार मात्र आपली भूमिका अधिक टोकदार करून त्या सावलीतून बाहेर पडले आणि अधिक तीक्ष्ण व व्यवहारी झाले. शरद पवारांच्या चाणाक्ष राजकारणाचा वारसदार म्हणून पाहिले जाणे अधिक सोयीचे, की स्वतंत्र निर्णयक्षमता संपादन केलेला समाजमान्य नेता म्हणून उभे राहणे अधिक सोपे या द्वंद्वात त्यांनी घेतलेले काही निर्णय वादग्रस्त होते खरे, पण ते दुर्लक्ष करण्यासारखे कधीच नव्हते. राष्ट्रवादी काँग्रेसची फाळणी करून शरद पवार यांच्या नेतृत्वाच्या सावलीतील पक्षाचे चिन्ह, झेंडा आणि मूळ पक्षावरच हक्क सांगणे असा धक्कादायक प्रयोग त्यांनी केला. ज्या विचारसरणीचा विरोध करणारे राजकारण त्यांनी कायम केले, त्याच विचारसरणीसोबत जाऊन सत्तेच्या नव्या मांडामांडीत उडी घेणे आणि ‘व्यवहार्य राजकारण’ सांभाळणेही त्यांना जमले. वैचारिक मतभेदापलीकडे जाऊन राज्यहिताची भूमिका सातत्याने आग्रहीपणे मांडण्याच्या स्वभावातून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नैतिकतेपेक्षा वास्तवाला अधिक महत्त्व देणारी भूमिका ठसठशीतपणे दाखवून दिली.
 
अजित पवार नावाच्या एका झंझावाताच्या अस्ताचा आघात महाराष्ट्राला सहन होणारा नाही. अजितदादा हे लोकानुनयी निर्णय घेऊन जनतेला स्वप्नांच्या दुनियेत रमविणारे राजकारण करणारे किंवा टीकाटोमण्यांच्या भावनिक आवाहनांनी जनसमुदायासमोर रडगाणे गाणारे नेते नव्हते. त्यांची राजकीय गणिते पक्की होती. बेरजेच्या, वजाबाकीच्या गणितांची उत्तरे अगोदर मांडून त्यानुसार ती गणिते आखणारे ते निष्णात गणिती होते. मतदारसंघ, जातीय समीकरणे, निधीवाटप, प्रशासनावर पकड, निर्णयाचे परिणाम किंवा दुष्परिणाम या सगळ्यांचा ते थंड डोक्याने हिशेब मांडत. त्यामुळेच अनेकांना ते ‘कठोर’ वाटले, तर काहींना हा त्यांच्या ‘कार्यक्षमते’चा पुरावा वाटला. काहींच्या लेखी त्यांचे राजकारण ‘अस्वस्थ करणारे’ देखील होते. त्यांचे राजकारण निष्प्रभ मात्र कधीच ठरले नाही. म्हणूनच, सत्ता कोणाचीही असो, सत्तेवर कोणताही पक्ष असो, अजित पवार कायम सत्तेच्या केंद्रस्थानी राहिले आणि महाराष्ट्राच्या अर्थकारणावरही त्यांचा प्रभाव राहिला.
 
अजित पवार यांच्या पश्चात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवी वळणे येऊ शकतात, असे मानले जात आहे. त्यांच्या नसण्यामुळे राजकारणात आणि महाराष्ट्राच्या वर्तमानकाळात भासणारी पोकळी ही आक्रमक राजकारणशैलीच्या संदर्भातील असेल. राज्याच्या हितासाठी सत्ता असणे गरजेचे आहे, असे ठामपणे ठणकावून, शरद पवार यांच्या सावलीतून बाहेर पडणारा आणि सत्तेच्या राजकारणातील सर्वांत मोठा धोका पत्करणारा नेता गमावल्याने, महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या वाटा कोणत्या दिशेला घेऊन जाणार याविषयी आता चर्चादेखील सुरू होईल. अजित पवार यांच्या अलिकडच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुभंगलेल्या वाटांवरून चालणारे वाटसरू पुन्हा एका वाटेवर येतील अशी चर्चा सुरू झाली होती. तसे राजकीय संकेतही मिळू लागले होते. आता त्याचे काय होणार हा राजकारणाचा प्रश्न झाला. त्याचे उत्तर राजकारणातच मिळेल. मात्र, महाराष्ट्राने एक क्षमतावान नेतृत्व गमावले असल्याची आणि ती पोकळी भरून निघणे शक्य नसल्याची जाणीव महाराष्ट्रास झाली आहे, एवढे खरे! मराठा राजकारण, राज्यातील सहकार चळवळ, पश्चिम महाराष्ट्राचा सत्ताकेंद्रित पट या सगळ्यांवर अजित पवारांची पकड होती. आता हे सगळे पट नव्याने मांडले जातील. महायुती नावाच्या एका आगळ्या राजकीय सत्ताकारणात सहभागी झालेले अजित पवार हे सत्तापक्षाकरिता कधी सोयीचे भागीदार ठरले, तर कधी अस्वस्थ करणारे सहप्रवासीदेखील ठरले. त्यांच्या नसण्याने सत्तेची गणिते सोपी होतील की अधिक गुंतागुंतीची, हा प्रश्नही आहेच. आज मात्र, अजित पवार यांचे निधन ही महाराष्ट्राची हानी आहे, हेच खरे. या अनाकलनीय आघातामुळे महाराष्ट्र एका संक्रमणाच्या टप्प्यावर उभा ठाकला आहे. या राज्यात भावनिक नेतृत्व आहे, आंदोलनातून उभे राहिलेले नेतृत्वदेखील आहे. पण प्रसंगी थेट सत्ताकेंद्रावर घाव घालणाèया नेतृत्वाची उणीवही महाराष्ट्राने अनुभवली आहे. अजित पवार यांच्या नसण्याने ही उणीव अधिक ठळक झाली आहे. अजित पवार हे ‘आदर्शवादी’ नेते नव्हते, अशी टीका केली जाते. ती काही अंशी खरीदेखील आहे. पण अनेकदा आदर्शवादाने नव्हे, तर ताकदीमुळेच राजकारणाची दिशा बदलते, हेही तितकेच खरे आहे. अजितदादांच्या राजकारणाने अनेक प्रश्न निर्माण केले, अनेक प्रस्थापित मूल्यांवर आघातही केला. पण त्याच वेळी निर्णयक्षमतेचा ठोस निकषही त्यांच्या नेतृत्वाने उभा केला. अजितदादा यांच्या नसण्यामुळे हा निकष कमजोर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.ajit pawar कदाचित, अजित पवार यांची नोंद भविष्यातील इतिहासात बंडखोर नेता म्हणून केली जाईल. कदाचित त्यांच्या राजकारणावर व्यवहारवादाचा शिक्कादेखील मारला जाईल. कदाचित, ही सगळीच अजित पवार यांची वैशिष्ट्ये म्हणूनही सांगितली जातील. पण असे असूनही, अजित पवार यांचे असणे आणि नसणे यातील फरक सर्वांना अंतर्मुख करणाराच असेल. त्यांची वेगळी ओळख कधीच पुसली जाणार नाही. म्हणूनच, त्यांच्या नसण्याची वेदना महाराष्ट्राच्या राजकीय विश्वासह साèयांना अस्वस्थ करणारी आहे. ‘तरुण भारत’ परिवारातर्फे अजित पवार यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली.