सीएनजी सिलेंडरने भरलेला ट्रेलर उलटला ; गॅस लीक

03 Jan 2026 18:25:16
गोंदिया,
cng-cylinder-trailer-overturned : सीएनजी सिलेंडर भरलेले ट्रेलर रस्त्याच्या मधोमध उलटून सिलिंडर मधून गॅस लिक झाल्याची घटना शनिवारी ३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय राज्य महामार्गावरील मुरदोली जंगल शिवारातील वाघदेव देवस्थान परिसरात घडली.
 
 
 
gondia
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार रिलायन्स कंपनीचे सीएनजी सिलेंडर गोंदिया येथे रिकामे करून रिकामे सिलेंडर ट्रेलर क्रमांक एम एच २७ डीटी १७०० मध्ये कोहमारा मार्गे नागपूरकडे घेऊन जात असताना गोंदिया -कोहमारा मार्गावरील मुरदोली जंगल शिवारात वाघदेव देवस्थान परिसरात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले. यावेळी अनियंत्रित ट्रेलर रस्त्याच्या मधोमध उलटले. त्यामुळे ट्रेलर मध्ये ठेवलेला एक सिलेंडर लीक झाला. सुदैवाने सिलेंडरध्ये थोडीफार सीएनजी असल्याने मोठा अपघात टळला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून ट्रेलर रस्त्याच्या मधोमध उलटल्याने काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
 
 
त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच गोंदिया येथील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक, गोरेगाव व सडक अर्जुनी येथील अग्निशमन विभागाचे पथक व गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून जमावाला घटनास्थळापासून दुर केले व रिलायन्सचे टेक्निकल पथक, बीपीएचसीएल, एचपीसीएल, एलपीजी ऑईल मार्केटिंग कंपनीचे टेक्निकल पथक यांना माहिती देण्यात आली. दरम्यान, संबंधित पथकांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. विशेष म्हणजे, सदर सिलेंडर रिकामे असले तरी त्यात काही प्रमाणात गॅस व केमीकल राहत असून अपघातात शॉट सर्कीट किंवा आग लागली असती तर मोठा अपघात घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बातमी लिहीपर्यंत घटनेची नोंद झालेली नव्हती.
Powered By Sangraha 9.0