अग्रलेख...
दि. २८ जानेवारीच्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Ajitdada Pawar अजितदादा पवार यांचा करुण अंत झाला. सार्या देशाला या घटनेचा धक्का बसला. तंत्रज्ञान एवढे अद्ययावत झालेले असताना अजूनही विमाने कां कोसळतात त्यांचे अपघात कां होतात, हा केवळ Aviation विमान वाहतुकीच्या क्षेत्रासाठी नव्हे तर सामान्यांच्या मनातलाही प्रश्न. विमान अपघाताची बातमी आल्याबरोबर लोकांना धक्का बसतो. विमान प्रवासाची भीती वाटू लागते. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले आहे, मंगळावर मोहिमा पाठवल्या आहेत. मानवाने अतिशय बुद्धिमान संगणक बनवले आहेत आणि अत्यंत प्रगत मशीन्स तयार केल्या आहेत. कृत्रिम पल्याडही सुपर इन्टेलिजन्सचे वारे वाहू लागले आहेत. विमानांमध्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा, सेन्सर्स, नेव्हिगेशन सिस्टम्स आणि ऑटोपायलट यंत्रणा अशा अनेक गोष्टी असतात. तरीही अपघात होतात. त्यामुळे विमान प्रवासाच्या सुरक्षिततेबद्दल शंका निर्माण होते. सामान्यांना प्रश्न पडतो, की जर तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली असेल तर विमाने पूर्णपणे क्रॅश-प्रूफ का नाहीत?... याचे उत्तर नाही. विमान वाहतूक सुरक्षित आहे यात वाद नाही. इतर परिवहन व्यवस्थांच्या तुलनेत विमानांचे अपघात कमीच आहेत. तरीही तंत्रज्ञानाला अनेक मर्यादा असतातच. तंत्रज्ञानाद्वारे जोखीम किमान पातळीवर आणली जाऊ शकते, परंतु ती कधीही पूर्णपणे संपत नाही. विमाने अशा वातावरणात उडत असतात, ज्यात भौतिकशास्त्र, हवामान, यांत्रिक प्रणाली आणि मानवी निर्णय या सार्यांचा असतो. चुकीच्या वेळी छोट्या समस्या उद्भवतात आणि त्यातून मोठे काही तरी घडते.
अजूनही विमानांचे अपघात कां होतात, हे समजून घेण्यासाठी, आपण प्रथम हे समजून घ्यायला हवे की, Aviation विमान हवेत उडते किंवा उडत राहते कारण त्याचे इंजिन उडण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती निर्माण करते. एरवी गुरुत्वाकर्षण नेहमीच विमानाला खाली खेचण्याचा प्रयत्न असते. यात काहीही बिघडले तरी विमानाचा तोल जाणे शक्य आहे. जमिनीवर धावताना कारचे इंजिन बिघडले तर कार थांबविली जाऊ शकते किंवा थांबते. हवेत उडत असलेल्या विमानाचे इंजिन बिघडले तर वैमानिकाच्या हाती फार वेळ नसतो. वेगामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर बनते. व्यावसायिक विमाने ताशी सुमारे ८०० किलोमीटर वेगाने प्रवास करतात. खाजगी जेट विमाने देखील ताशी ५०० ते ६०० किलोमीटर वेगाने जातात. नेमके काय घडते आहे, हे समजून घेण्यासाठी आणि प्रतिक्रिया देण्यासाठी वैमानिकांना फार कमी वेळ मिळतो. उड्डाणाचे सर्वांत धोकादायक टप्पे म्हणजे टेकऑफ आणि लॅण्डिंग. बहुतेक अपघात या दोन टप्प्यांवर होतात. कारण विमान जमिनीच्या जवळ असते आणि वैमानिकांकडे कोणत्याही अडचणीतून फार कमी वेळ (अगदी काही सेकंदांचा) असतो. लॅण्डिंग दरम्यान हवामान, दृश्यमानता आणि धावपट्टीची परिस्थिती सर्वांत महत्त्वाची असते. क्रूझिंगच्या विशिष्ट उंचीवर असताना काही समस्या निर्माण झाल्यास वैमानिकांना विचार करण्यासाठी आणि कृती करण्यासाठी वेळ मिळतो. जमिनीजवळ असताना तशी परिस्थिती नसते.
याशिवाय, हवामान हा विषय विमान वाहतुकीतील सर्वांत मोठ्या आव्हानांपैकी असतोच. कोणतेही निसर्गावर नियंत्रण ठेवू शकत नाही. वैमानिकांना धुके, पाऊस, वादळे, जोरदार वारे, वीज इत्यादी गोष्टींचा उड्डाणादरम्यान सामना करावा लागतो. धुक्यामुळे दृश्यमानता इतकी कमी होऊ शकते की शेवटच्या क्षणापर्यंत धावपट्टी दिसत नाही. वादळामुळे वर आणि खाली शक्तिशाली हवेचे प्रवाह निर्माण होतात. पायलट, सह-पायलट, हवाई वाहतूक नियंत्रक, देखभाल अभियंते आणि ग्राऊंड स्टाफ सर्व महत्त्वाची भूमिका बजावत असतातच. पण, शेवटी ती माणसेच आहेत. ती तणावग्रस्त होऊ शकतात किंवा गोंधळून जाऊ शकतात. ती सूचनांचा चुकीचा अर्थ लावू शकतात. उपकरणांचे रीडिंगही चुकीचे होऊ शकते. आतापर्यंतच्या अनेक अपघातांच्या चौकशा असे सांगतात की, विमानांचे अपघात हे मोठ्या चुकीपेक्षाही चुकीच्या किंवा त्रुटीपूर्ण मानवी निर्णयांच्या साखळीमुळे घडतात.
Aviation विमान देखील मशीन आहे आणि सर्व मशीन्सप्रमाणे ते देखील बिघडू शकते. विमानात हजारो सुटे भाग असतात. इंजिन, वायर्स, सेन्सर्स, संगणक, हायड्रॉलिक्स, लॅण्डिंग गियर आणि बरेच काही. देखभालीचे कठोर नियम असूनही, काही भाग जीर्ण होऊ शकतात, काही ठिकाणी दोष निर्माण झालेले असू शकतात. काही वेळा मॅन्युअल अर्थात मानवी नियंत्रण आणि स्वयंचलित यांच्यात गोंधळ निर्माण होऊ शकतो. जगातील कोणतेही मशीन पूर्णपणे अपयश-प्रतिरोधक नाही. त्याला विमान अपवाद असू शकत नाही. सुरक्षेत पायाभूत सुविधा देखील भूमिका बजावत असते. मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर प्रगत लॅण्डिंग सिस्टम, रडार सपोर्ट, शक्तिशाली रनवे लाईटिंग आणि अचूक हवामानविषयक माहिती देणारी यंत्रणा असते. छोट्या विमानतळांवर या सर्व सुविधा असतीलच असे अशा ठिकाणी, वैमानिकांना त्यांना जे काही दिसत असते, त्यावरच अधिक अवलंबून राहावे लागते. विशेषतः प्रतिकूल हवामान किंवा रात्रीच्या लॅण्डिंग दरम्यान यामुळे धोका वाढतो. विमान वाहतूक ही अशाप्रकारची जोखीम शक्य तितकी कमी करण्यासाठी डिझाईन केलेली आहे यात वाद नाही. पण, जोखीम शून्य असे डिझाईन अद्याप तयार झालेले नाही. ज्याप्रमाणे रुग्णालयात रुग्णाचा कधीही मृत्यू होणार नाही याची हमी दिली जाऊ शकत नाही, त्याचप्रमाणे कोणत्याही विमानाचा कधीही अपघात होणार नाही, याचीही खात्री देता येत नाही. अत्यंत कडक सुरक्षा मानके, अनेक बॅकअप सिस्टम आणि भूतकाळातील चुकांपासून सतत शिकणे व सुधारणे त्यासाठी आवश्यक असते. विमान वाहतूक ही सांख्यिकीयदृष्ट्या रस्ते प्रवासापेक्षा बरीच सुरक्षित झाली ती या सुधारणांमुळे आणि त्या सुधारणांच्या मुळाशी पूर्वीच्या चुकाच होत्या.
अनेक लोक विमान वाहतुकीची तुलना अंतराळ मोहिमांशी करतात आणि विचारतात की, आपण मंगळावर जाऊ शकत असू तर आपण विमानांना पूर्णपणे सुरक्षित का बनवू शकत नाही? ही तुलना योग्य नाही. बहुतांशी अंतराळ मोहिमा मानवरहित किंवा दूरस्थपणे (रिमोटली) नियंत्रित असतात, वर्षानुवर्षे नियोजन झालेले असते आणि त्यांना विमानाच्या वाट्याला येणार्या हवामानाच्या प्रतिकूलतेचा सामना करावा लागत नाही. प्रवासी विमाने दररोज ठरलेल्या वेळी उड्डाण व लॅण्डिंंग करतात. त्यांची सुरक्षितता मानवी निर्णयांवर अवलंबून असते. सगळे विमान अपघात एकाच कारणामुळे होत नाहीत. ते छोट्या-छोट्या समस्यांच्या साखळीमुळे होतात. हवामानातील प्रतिकूलता, छोटासा तांत्रिक बिघाड, चुकीचा निर्णय हे एकत्रित घडले तर धोकादायक परिस्थिती निर्माण होते. वैमानिकांना फार कमी वेळात यातले नेमके काय ते ओळखावे लागते आणि संचालन करावे लागते. वैमानिक दबावाखाली काम करतात. त्यांच्यावर असंख्य जिवांची जबाबदारी असते. संकट समोर दिसत असताना त्यांचाही ताण वाढत असणार. विचार करण्याची क्षमता प्रभावित होत असणार. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे अर्थात देखभालीचा. ती देखील मानवी निरीक्षण व कृतीवर अवलंबून असते. तपासणी परिपूर्ण झाली नसेल तर किरकोळ दोष दुर्लक्षित होऊ शकतो आणि तोच मोठा होऊन घातक ठरू शकतो. आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की विमान प्रवास हा परिवहनाच्या सर्वांत सुरक्षित मार्गांपैकी एक आहे. लाखो उड्डाणे सुरक्षित चालतात. रस्ते अपघातात मृत्यूची शक्यता विमान खूप जास्त असते. तथापि, विमानाचा अपघात होतो तेव्हा त्यात प्राणहानी मोठी होते आणि धक्कादायक असे बरेच काही असते. विमान प्रवासाबद्दल नकारात्मकता बाळगण्याचे कारण नाही. आधुनिक काळात तो अनेकांसाठी गरजेचा आहे. तंत्रज्ञानाने जोखीम कमी होऊ शकते. परंतु ते भौतिकशास्त्राचे नियम बदलू शकत नाही, हवामान नियंत्रित करू शकत नाही किंवा मानवी मुद्दा निकालात काढू शकत नाही, हे वास्तव दुर्लक्षित करता येत नाही.