अर्थसंकल्पाआधीच खाद्यतेल दरवाढीने घरगुती बजेट ढासळले

    दिनांक :30-Jan-2026
Total Views |

अर्थसंकल्पाआधीच स्वयंपाकघराला झटका; खाद्यतेल दरवाढीने घरगुती बजेट ढासळले

budget 2026 च्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या खाद्यतेलांच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. कोणताही सण-उत्सव नसतानाही शेंगदाणा, सोयाबीन आणि सूर्यफूल तेल महागल्याने गृहिणींच्या डोक्यावरील ताण वाढला असून घरगुती बजेट कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

budget  
 

गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलांच्या किमती स्थिर असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र ही स्थिरता आता संपुष्टात येताना दिसत आहे. बाजारात हळूहळू सर्वच प्रकारच्या तेलांच्या दरात वाढ जाणवू लागली असून व्यापाऱ्यांनीही पुढील काळात दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारलेली नाही.

यंदा पावसाच्या लहरीपणाचा फटका तेलबियांनाही बसला आहे. काही भागांत पावसाचा अभाव, तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे भुईमूग आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बाजारात कच्च्या मालाची आवक घटली असून याचा थेट परिणाम तेलाच्या किमतींवर झाला आहे. विशेषतः शेंगदाण्याची आवक कमी झाल्याने शेंगदाणा तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

सध्या बाजारात सोयाबीन तेल 136 ते 145 रुपये किलो दरम्यान विकले जात असून सूर्यफूल तेलाचे दर 143 ते 150 रुपये किलोवर पोहोचले आहेत. सर्वाधिक महागाई शेंगदाणा तेलात पाहायला मिळत असून त्याचे दर 170 ते 210 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. सणासुदीचा हंगाम नसतानाही ही दरवाढ झाल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

दरवाढीमागे केवळ देशांतर्गत कारणेच नव्हे, तर जागतिक बाजारातील घडामोडीही कारणीभूत ठरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या खाद्यतेलांच्या किमती वाढत असून त्याचा परिणाम भारतीय बाजारावर होत आहे.budget 2026 याशिवाय केंद्र सरकारकडून आकारले जाणारे 20 टक्के आयात शुल्क, डॉलरच्या वाढत्या किमती आणि आयातीचा वाढलेला खर्च यामुळे तेल महाग होत आहे.

ही परिस्थिती लवकर बदलली नाही, तर येत्या काळात खाद्यतेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाआधीच महागाईचा फटका बसलेल्या सामान्य नागरिकांना पुढील काळात घरगुती खर्च अधिक काटेकोरपणे नियोजित करावा लागणार आहे.