डिजिटल प्रतिकृती : उद्याचे आभासी वास्तव

    दिनांक :30-Jan-2026
Total Views |
तंत्रवेध
डॉ. दीपक शिकारपूर
सयामी जुळे वा जुळ्या व्यक्तीबद्दल आपण जाणतो. साधारण एकमेकांसारखेच दिसणारे आणि काही वेळा एकसारखाच विचार करणारे ते एक व्यक्तिमत्त्व असते. अनेक वेळा जुळे इतके सारखे दिसतात की कुठला हेही ठरवणे अवघड जाते. हे झाले भौतिक विश्वाबद्दल. आता घटकाभर कल्पना करा की, आपली एक प्रतिकृती डिजिटली तयार झाली तर? या प्रतिकृतीला डिजिटल ट्विन (जुळे) असे म्हटले जाते. एखाद्या वस्तूचा Digital Twin डिजिटल ट्विन म्हणजे तिची आभासी प्रतिकृती. ही प्रतिकृती मूळ वस्तू/व्यक्तीची इत्थंभूत माहिती मिळवून पूर्ण जीवनचक्राचे सदृशीकरण (सिम्युलेशन) करते. ट्विन हे एखाद्या वास्तविक वस्तूचे, प्रणालीचे किंवा प्रक्रियेचे अत्यंत तपशीलवार आभासी प्रतिबिंब असते. हे प्रतिबिंब सॉफ्टवेअरच्या साहाय्याने तयार केले जाते आणि वास्तविक वस्तूच्या सर्व वैशिष्ट्यांचे अनुकरण करते.
 
 
digi
 
Digital Twin डिजिटल ट्विन हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, जे एखाद्या भौतिक वस्तू, प्रणाली किंवा प्रक्रियेचे अत्यंत तपशीलवार आभासी प्रतिनिधित्व तयार करते. या आभासी डिजिटल ट्विन म्हणतात. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे डिजिटल क्षेत्र आणि वास्तविक जगाचे एकत्रीकरण झाले आहे. यामुळे डिजिटल ट्विन तंत्रज्ञान एक अपरिहार्य साधन म्हणून उदयाला आले आहे. या तंत्रज्ञानामुळे उद्योगांना आकार मिळतो आहे, व्यवहारांमध्येही क्रांती घडते आहे. सुरुवातीच्या काळात फक्त उत्पादनाच्या स्तरावर याची कल्पना केली होती. पण आता आभासी जगात आणि भौतिक हे डिजिटल तंत्रज्ञान वापरात येणार आहे. डिजिटल ट्विन हा शब्द सगळ्यात पहिल्यांदा मिशिगन विद्यापीठात डॉ. मायकेल ग्रीव्हस यांनी २००२ मध्ये सादर केला होता. सुरुवातीच्या काळात उत्पादन क्षेत्रात ही संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर ही कल्पना मोठ्या प्रमाणात अ‍ॅप्लिकेशन्सचा समावेश करण्यासाठी विकसित झाली. डिजिटल ट्विनमध्ये विविध परिस्थितींचे अनुकरण करून आणि विश्लेषण करून भविष्यसूचक देखभाल, परिपूर्ण व्यवहार आणि उत्पादन विकासामध्ये नावीन्य आणले जाते. भौतिक मालमत्ता आणि प्रक्रियांच्या कामगिरीचे परीक्षण, विश्लेषण आणि त्याची क्षमता वाढवण्यासाठी उत्पादन, आरोग्यसेवा, वाहतूक आणि शहरी नियोजन यासारख्या विविध उद्योगांमध्ये डिजिटल ट्विन्सचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या परिस्थितींची पडताळणी करू शकते, त्याच्या परिणामांचा अंदाज लावू शकते निर्णय घेण्यासाठीही मदत करू शकते.
 
 
मेटाव्हर्समध्ये एक आभासी जागा तयार केली जाते. यामध्ये वापरकर्ते डिजिटल वातावरणाशी आणि एकमेकांशी संवाद साधतात आणि Digital Twin डिजिटल ट्विनिंगला अनेक प्रकारे छेदतात. मेटाव्हर्स विकसित होत असताना समग्र आणि एकमेकांशी जोडलेले आभासी जग तयार करण्यासाठी डिजिटल ट्विन कणा म्हणून काम करू शकतात. हे तंत्रज्ञान वापरकर्त्यांना मेटाव्हर्समध्ये अत्यंत तपशीलवार आणि अचूक प्रतिनिधित्व तयार करण्यास सक्षम बनवू शकते. यामुळे वैयक्तिक स्वरूपाचे आणि खरे असल्यासारखे अनुभव घेता येतात. उदाहरणार्थ, व्हर्च्युअल शॉपिंगमध्ये उत्पादनांचे डिजिटल ट्विन्स खरेदीचे निर्णय घेण्यासाठी वापरकर्त्यांना मदत करू शकतात. शिवाय डिजिटल ट्विन्स मेटाव्हर्समधील विविध मंच आणि यंत्रणांमधील देवाणघेवाण सुलभ करतात. तसेच विविध आभासी वातावरणांमध्ये अखंड संवाद परस्परसंवादही घडवून आणतात. या देवाणघेवाणीमुळे परस्परसंबंधित अनुभव घेता येतात आणि जागतिक स्तरावर सहयोग आणि नवकल्पना वाढीला लागते. डिजिटल ट्विन्स विविध क्षेत्रांमध्ये खोली, समृद्धता आणि कार्यक्षमता वाढवून मेटाव्हर्सचा लक्षणीय विस्तार करू शकतात. याव्यतिरिक्त स्मार्ट शहरे, औद्योगिक संयंत्रे किंवा नैसर्गिक वातावरण यासारख्या संपूर्ण इकोसिस्टिमचा समावेश करण्याच्या उद्देशाने डिजिटल ट्विन वैयक्तिक प्रतिनिधित्वाच्या विस्तारू शकतात. रिअल-टाईम डेटा आणि सिम्युलेशन एकत्र करून हे तंत्रज्ञान बहुआयामी आणि प्रतिसादात्मक आभासी जग आणखी सक्षम करते. यामुळे त्यांच्या भौतिक समकक्षांना जवळून प्रतिबिंबित करता येते. डिजिटल जुळे डेटा स्रोतांशी जोडलेले असतात. परिधान केलेल्या एका छोट्या उपकरणाद्वारे आपले डिजिटल विश्व साठवले जाते. आपण भेटलेल्या व्यक्ती, त्यांचे सोशल प्रोफाईल्स, झालेले व्यवहार या सर्व बाबींचा त्यात अंतर्भाव असतो. अनेक वर्षांच्या साठवणुकीनंतर या माहितीचे एआय तंत्राद्वारे पृथक्करण करून काही विशिष्ट साचे, वर्तणुकीचे प्रकार तयार केले जातात. या संकल्पनेचा उपयोग आपल्याला स्मरण केलेल्या गोष्टी साठवण्यासाठी करता येऊ शकतो. मानवी मेंदूमध्ये ही अफाट क्षमता आहे. पण कालानुरूप त्यात त्रुटी निर्माण होतात. अनेकांना विस्मरण एखादी व्यक्ती समोर येते पण नाव आठवत नाही. कधी कधी नाव आठवते, पण व्यक्ती डोळ्यासमोर येत नाही. इथे आपला डिजिटल जुळा आपल्याला मदत करू शकतो. एआयमधील प्रेडिक्टिव्ह अनॅलिटिक्स तंत्रामुळे आपण एखाद्या व्यक्तीला वा एखाद्या ठिकाणी जायच्या आधी त्यासंबंधी माहितीची खातरजमा, उजळणी आधीच करू शकतो. काही टूल्स तुम्हाला हवी तेव्हा अर्थात मदत करू शकतात. आपला घसा बसला असेल तर, आपल्या वतीने संभाषणही करू शकतात. यात आपल्या आवाजाचे, लकबींचे पृथक्करण केले असते. फक्त यासाठी आपले संभाषण (अनेक वर्षांचे) रेकॉर्ड केले जाते. यासाठी वेअरेबल (परिधान केलेले संगणकीय उपकरण) वापरले जाते. ‘प्लॉड’ या एआय उद्योगाने नोट नावाचा एक स्लिम सक्षम ऑडिओ रेकॉर्डर केला आहे.
 
 
हा ऑडिओ तुमच्या फोनच्या मागील बाजूस अडकवला जाऊ शकतो किंवा तुमचे संभाषण रेकॉर्ड करण्यासाठी, हावभाव रेकॉर्ड करण्यासाठी आणि सारांशित करण्यासाठी शर्टच्या खिशात ठेवला जातो. हे तंत्र नेहमी तुमचे संभाषण ऐकते आणि कालांतराने तुमचे व्यक्तिमत्त्व, तुमचा प्राधान्यक्रम, संवाद जाणून घेत काही वर्षर्ांत तुमचे Digital Twin डिजिटल जुळे तयार करते. या आणि चॅटजीपीटीसारख्या जनरेटिव्ह एआय टूल्समध्ये बराच फरक आहे. चॅटजीपीटी सार्वत्रिक डिजिटल माहितीसंग्रहाचे पृथक्करण करते आणि माहिती निर्माण करते. इथे तसे नाही, फक्त आपला डिजिटल ट्विन आपल्याशी संबंधित माहितीचे पृथक्करण करतो आणि गरज पडल्यास आपली जागादेखील घेतो. यामुळे आपल्या मानवी मेंदूच्या क्षमता कमी होतील असे काही जणांना वाटते. गुगल मॅप आपण दिशा शोधतो. इच्छित स्थळ शोधतो. पूर्वी आपण स्मरणशक्तीला ताण देऊन विचारत विचारत एखादा पत्ता शोधत असू. एकदा कष्टाने पत्ता शोधला की कायम लक्षात राहत असे. आता हेच तंत्र सर्वत्र हातपाय पसरू लागले आहे. यामुळे भविष्यात माणसाचे आयुष्य नक्कीच सुसह्य होणार आहे. फक्त एक मोठा धोका आहे तो सुरक्षेचा. सर्व माहिती सायबर गुन्हेगारांनी चोरली तर ते दुरुपयोग करू शकतात. सर्वच तंत्रांना असा धोका असतोच. त्यामुळे जास्त काळजी घेतली पाहिजे हे वास्तव आहे. तंत्रज्ञान चहुदिशांनी विस्तारत असून प्रगतीची नवनवी कवाडे उघड होत आहेत. त्यातून नित्य नेमाने नवे तंत्रज्ञान जुन्या तंत्रज्ञानाची जागा घेत आहे. यातूनच मानवी विकासाला नवी दिशा मिळत त्याचा सगळ्यात मोठा फायदा उद्योग आणि सेवाजगत घेत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र अशाच भरार्‍या घेत राहणार आहे. त्यात तगण्यासाठी आणि स्वविकास साधण्यासाठी तंत्रज्ञांबरोबरच सामान्यांना आणि युवा पिढीला सतत तयारीत राहावे लागणार आहे. 
 
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)