वेध
प्रफुल्ल व्यास
Old friend विज्ञानाने सारे जग मुठीत घेतले. पण, माणूस दुरावतो, माणुसकी हरवत चाललेली आहे, अशी अनेक दूषणे दिली जातात. नव्या जुन्यांची तुलना करताना आजच्या पिढीवर प्रश्नचिन्हे उभी केली प्रत्यक्षात आजचे चित्र वेगळे आहे. त्याला भेटावसं, बोलावसं वाटत असेलही. पण, शारीरिक, बौद्धिक क्षमतेच्या वर नोकरी, व्यवसायात तो-ती गुंतून गेले आहेत. माणूस अनेक लोकांमध्ये वावरतो. पण, त्यात कुठे तरी व्यावहारिक झालर असते. पण, शाळा किंवा महाविद्यालयीन जीवनात निर्माण झालेली मैत्री अपेक्षाविरहित आणि मनाच्या खोल कप्प्यात कायमची जपलेली असते. शिक्षण झाल्यानंतर आयुष्य प्रत्येकाला वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या दिशांनी घेऊन जाते. नोकरी, व्यवसायासाठी गावाबाहेर जातो, तर कोणी कुटुंबाच्या जबाबदार्यांमध्ये इतका गुंततो की जुने मित्र हळूहळू संपर्काबाहेर जातात. अनेक वर्षे सोबत शाळेत गेलेले, एकाच बाकावर बसलेले, डबा वाटून खाल्लेले, एक कट चहा दोघे वाटून घेणारे मित्र विखुरले जातात. कुठल्या तरी सुख दु:खात आठवणी निघतात. चर्चा होते आणि पुन्हा आपल्या गुंताळ्यात सर्व गुंतले जातात.
कोरोनानंतर जगण्याचा अर्थ कळला आणि पुन्हा भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला जातो. अशा परिस्थितीत ‘व्हॉट्सअॅप’सारख्या माध्यमाने शाळेतील मित्रांना पुन्हा एकत्र आणण्यात मोठी भूमिका बजावली आहे. एखादा Old friend जुना मित्र, मैत्रीण पुढाकार घेते. संपर्क शोधले जातात आणि हळूहळू एक व्हॉट्सअॅप ग्रुप होतो. अगदी विदेशात राहूनही आपले वर्गमित्र शोधून त्यांना व्हॉट्सअॅपच्या माळेत गुंफले जाते. पहिल्या काही दिवसांत ओळख परेड होते. नावं ओळखीची वाटतात, पण चेहरा आठवत नाही. मुली सासरी गेल्याने त्यांची सासरची आडनावं कळत नाही. अशा वेळी कुणी जुन्या आठवणी काढतो, कुणी वर्गातल्या खोड्यांचा उल्लेख करतो तर कुणी शिक्षकांचे किस्से सांगतो. संवादातून माजी विद्यार्थी स्नेहमिलन मेळाव्याची कल्पना पुढे आली असावी. आज गावागावांत माजी विद्यार्थी मेळावे होत आहेत. बर्याच मेळाव्यांसाठी देशविदेशातून मित्र येतात. शाळेच्या जुन्या आठवणींमध्ये ते रमून जातात. हिंगणघाट येथे मोहता शाळेतील माजी विद्यार्थी इक्राम हुसैन यांनी शाळेला ११ हजारांची भेट दिली. मेहकर येथे ज्येष्ठ पत्रकार नितीन कुळकर्णी यांच्या १९८८ तुकडीने तर एक दिवस अख्खी शाळा डोक्यावर घेतली होती. वर्धेतील १९९० सालच्या तुकडीने मंदार अभ्यंकर यांच्या नेतृत्वात रत्नीबाई विद्यालयातील माजी शिक्षकांचा सत्कार केला. १९९१-९२ च्या तुकडीने २०१६ मध्ये मथुरादेवी शाळेतील माजी विद्यार्थी उद्योजक वैभव काशिकर, सचिन अग्निहोत्री यांनी लहानपणी शाळेत सांभाळ करणार्या मावशींचा सन्मान केला होता. न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये च्या तुकडीने प्रदीप बजाज यांच्या पुढाकारात झालेल्या विद्यार्थी मेळाव्यात शाळेला मराठी भाषेची प्रयोग शाळा, वॉटर कूलर, खुर्च्यांची भेट दिली होती. अमरावती जिल्ह्यातील जरूड येथील १९९० च्या तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप अमेरिकेतील मैत्रीण ममता गोळे हिने तयार केला.
Old friend आठवणी ताज्या करताना प्रदीप सातपुतेने शाळेतील पाण्याच्या टाकीची अवस्था बघून डोळ्यात आल्याची भावना व्यक्त करताना शाळेचा जिव्हाळा जाणवतो. त्याचे कारण म्हणजे शिक्षणाचे बाजारीकरण झाले नव्हते आणि शिक्षक व्यावहारिक नव्हते. शाळेला काचेचे मुलामे चढले नव्हते. तिथे सर्व समान होते. माजी विद्यार्थी मेळाव्यात चेहर्यावर वयाची छाया दिसते, केस पांढरे झालेले असतात. पण, माजी विद्यार्थी मेळावा आठवणींचा, भावनांचा आणि आत्मीयतेचा संगम ठरतो. माजी मेळावे हे समाजाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरतात. यातून सामाजिक बांधिलकी वाढते, एकमेकांना मदतीची भावना निर्माण होते आणि भविष्यातील पिढ्यांसाठी आदर्श उभा राहतो. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास नाती कशी जपता येतात, याचं हे जिवंत उदाहरण आहे. माजी विद्यार्थी मेळावे नात्यांचं पुनर्बांधणीचं काम करतात. या माध्यमातून मैत्रीचा पूल बांधला जातो. परंतु, आजच्या त्याचा विपर्यासही होता कामा नये! माजी विद्यार्थी मेळाव्याच्या माध्यमातून कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात विनाकारण न डोकावता हा मैत्रीचा सेतू असाच वाढत जावा त्याचे एक नवीन कुटुंब तयार व्हावे! कामाच्या प्रचंड व्यापात असलेल्यांना आता कुठेतरी एकत्र यावेसे वाटते आहे. माजी विद्यार्थी मेळावा हा त्याची पायरी ठरावा आणि विखुरलेले कुटुंब एकत्र येत कुटुंब पद्धती या जुन्या मैत्रीतील नव्या पर्वाचे शिखर ठरावे.
९८८१९०३७६५