democracy 26 जानेवारी 2026 रोजी आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला. भारत 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक झाला. या दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली. तेव्हापासून भारताने आपल्या स्वत:च्या घटनात्मक चौकटीनुसार स्वत:चे शासन करण्यास सुरुवात केली. 1930 च्या पूर्ण स्वराज्य घोषणेचा सन्मान करण्यासाठी 26 जानेवारी हा दिनांक प्रजासत्ताकसाठी निवडण्यात आला, कारण तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश राजवटीपासून संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती. भारतीय संविधानाची निर्मिती संविधान सभेने केली, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेला जवळपास तीन वर्षे लागली, ज्यामुळे आपले संविधान हे जगातील सर्वांत तपशीलवार संविधान झाले. म्हणजेच आपण सर्वांगीण आणि सखोल विचार करून संविधानाची निर्मिती केली आहे. आज इतक्या वर्षांनंतर आपण जेव्हा काही गोष्टी पाहतो तेव्हा एक प्रश्न मनात निर्माण होतो की खरोखर आपण लोकशाहीच्या योग्यतेचे आहोत का?
भारताची लोकशाही ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून ओळखली जाते. आपण संघराज्य आहोत. म्हणजे आपल्याकडे राज्य सरकारही आहे आणि केंद्र सरकारही आहे. आपल्याकडे न्यायव्यवस्थेसाठी स्वतंत्र यंत्रणा आहे आणि या सर्वांनी मिळून आपण एक राष्ट्र म्हणून अभिमानाने जगत आहोत. पण प्रजासत्ताक दिनाला 76 वर्षे पूर्ण झाल्यानंतर भारतीय जनता म्हणून आपल्याला आता गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वी अंजली भारती यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर अश्लाघ्य भाष्य केले होते. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमात जमलेल्या एकाही व्यक्तीला त्यांनी केलेले कृत्य चुकीचे आहे असे म्हणावेसे वाटले नाही. उलट अनेकांनी टाळ्या वाजवल्या. सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतर अंजली भारती यांनी माफी मागितली. पण त्यात जाणिवेचा अभाव होता. मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशनवर ओमकार शिंदे या तरुणाने अगदी क्षुल्लक वादावरून अलोक कुमार सिंह या 33 वर्षीय प्राध्यापकाचा खून केला. मुंबई लोकल ही तशी संवेदनशील जीवनवाहिनी आहे. कारण इथे रोज वाद, मारामाèया होतच असतात. पण छोट्याशा वादावरून खून केल्याच्या घटना सहसा घडत नाहीत. असे मानसिक रुग्ण जर लोकलमधून प्रवास करणार असतील तर ही जीवनवाहिनी देखील सुरक्षित नाही, असं म्हणण्याची पाळी येईल. माणसातला संयमीपणा लोप पावतोय का? सूरज शिर्के नावाच्या मराठी तरुणाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यामुळे दोन्ही गटांतील कार्यकर्ते चिडले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला मारहाण केली व त्याची सुमारे दीड किलोमीटर अर्धनग्न धिंड काढली. त्यानंतर सूरजने हात जोडून दोन्ही ठाकरे बंधूंची जाहीर माफी मागितली आहे. सूरजने प्रसिद्धीसाठी दोन्ही ठाकरे बंधूंना शिवीगाळ केली. मुळात अशा प्रकारच्या गलिच्छ टीकेची गरजच नाही. तुम्ही संवैधानिक भाषेत टीका करू शकता. सूरजचं चुकलं, पण... मनसेच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला. अर्थात ती त्यांच्या सवयीची बाब आहे म्हणा. मात्र लोकशाहीत कायदे हातात घ्यायचे झाले, तर स्वत:ला नेते म्हणवणारे लोक किती अपराध करत असतात आणि त्यांचे कार्यकर्ते किती दादागिरी करत असतात, अशा परिस्थितीत जनतेने कायदा हातात घ्यायचं ठरवलं तर लोकशाही टिकेल?
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. ज्या दिवशी ही बातमी कळली, तेव्हाच लगेच काही लोक ‘‘हा घातपात आहे... ’’ अशा पोस्ट्स करू लागले. काही लोकांनी तर अजितदादांवर टीका केली. विशेष म्हणजे यात सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि जबाबदार पदांवर राहिलेले लोक होते. ज्यावेळी एखादी व्यक्ती हे जग सोडून जाते तेव्हा त्या व्यक्तीच्या कुटुंबाला किती यातना होत असतील. ती व्यक्ती मोठी असल्याने तिचे कार्यकर्तेही दु:खी असतात. अशा वेळी कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला तर किती मोठा प्रसंग उभा राहू शकतो. एखादी व्यक्ती गेल्यानंतर काही दिवस तरी बटणं बडवू नका. सोशल मीडिया ही चावडी झाली आहे. इथे केवळ सामान्य माणूसच नव्हे तर जबाबदार माणूसही काही बरळतो. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालंय, संविधान मिळालंय, त्यामागची भावना आपण कधी समजून घेणार आहोत? कायदे मोडणे. कायदे हातात घेणे, गंभीर परिस्थिती निर्माण होईल असे वर्तन वा वक्तव्य करणे, क्षुल्लक वादावरून मारहाण किंवा खून करणे यासाठी आपण प्रजासत्ताक झालोय का?
या सगळ्या घटना उदाहरणासाठी दिलेल्या आहेत. नागरिक म्हणून आपण किती बेजबाबदार आहोत, याचे अनेक दाखले देता येतील. प्रत्येक वेळी सिस्टिमला दोष देऊन चालत नाही. देशाने माझ्यासाठी काय केलं? हा प्रश्न विचारण्याआधी मी देशासाठी काय केलं? हा प्रश्न विचारण्याची सवय लावून घेतली पाहिजे. आपली लोकशाही मजबूत आहे, आपलं संविधान सशक्त आहे. पण आपल्या देशाची खरी ताकद आपल्या प्रत्येक नागरिकाच्या वर्तणुकीत आहे. संविधानाने आपल्याला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले, पण ते जबाबदारीने वापरणे गरजेचे आहे. मतभेद असतील, टीका असतील, पण ती अभद्र, हिंसक किंवा कायद्याच्या पलीकडे जाऊन करू नये. जेव्हा वादातून लोक खून करू लागतात, जेव्हा सोशल मीडियावर मृत व्यक्तीच्या कुटुंबाला दुखावणाèया पोस्ट्स केल्या जातात, जेव्हा राजकीय मतभेदांमुळे कायदे हातात घेतले जातात, तेव्हा खरा प्रश्न उभा राहतो. आपण खरंच लोकशाहीच्या योग्यतेचे आहोत का? 77 वर्षांत आपण खूप प्रगती केली.democracy जगातील सर्वांत मोठी लोकशाही, आर्थिक विकास, तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण. पण हे सगळे टिकवायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने स्वत:मध्ये बदल करायला हवा. आज आपल्याला फक्त राजकीय लोकशाहीच नव्हे, तर सामाजिक संयम, सहिष्णुता आणि जबाबदारीने वागण्याची गरज आहे. अन्यथा हे 77 वर्षांचे यश धोक्यात येईल. आपण सर्वांनी स्वत:ला विचारायला हवे की, मी लोकशाहीला मजबूत करतोय की कमकुवत करतोय? कारण लोकशाही ही फक्त सरकारची नाही, ती आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. जर आपण संयम ठेवला, सहानुभूतिपूर्ण वागलो आणि कायद्याचा आदर ठेवला, तरच लोकशाही खèया अर्थाने टिकू शकेल आणि वृद्धिंगत होऊ शकेल. अन्यथा हा प्रश्न कायम राहील - आपण लोकशाहीच्या योग्यतेचे आहोत का?
जयेश शत्रुघ्न मेस्त्री