कवी - लेखकांची भाषा अनेकांना प्रभावित करणारी

मराठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांचे प्रतिपादन

    दिनांक :31-Jan-2026
Total Views |
नागपूर,
avinash-avalgaonkar : भाषा ही विविध प्रकारांनी मानवी जीवनाच्या सर्व अंगांना व्यापून टाकणारी गोष्ट असल्याने भाषा ही मानवाची गरज पूर्ण करणारी आहे. दैनंदिन वापरातील सर्वसामान्यांची भाषा आणि कवी - भाषा वेगळी असते. मात्र लेखकांची भाषा वाचकांना विचार करण्यास बाध्य करणारी असल्याने अशी भाषा अनेकांना प्रभावित करणारी असल्याचे स्पष्ट प्रतिपादन मराठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी केले.
 

avinash-avalgaonkar 
विश्व मराठी परिषद, विदर्भ सांस्कृतिक परिषद, दिलीपराज प्रकाशन आणि पद्मगंधा प्रकाशनातर्फे पंचशील चौकातील टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात आयोजित तीन पुस्तकांच्या प्रकाशन ते बोलत होते. याप्रसंगी लेखक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. वि.स. जोग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. कोमल ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
लेखक श्रीपाद जोशी यांचे राजहंस प्रकाशन प्रकाशित, ’त्यानंतर’, पद्मगंधा प्रकाशनातर्फे प्रकाशित ’सर्ग’ हे दोन कविता संग्रह आणि प्रकाशनातर्फे प्रकाशित ’समीक्षेची संस्कृती आणि संस्कृतीची समीक्षा’ हा समीक्षा विषयक ग्रंथ या तीन पुस्तकांचे प्रकाशन डॉ. अविनाश आवलगावकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रख्यात ज्येष्ठ लेखक, समीक्षक डॉ. वि.स. जोग यांच्या हस्ते झाले.
 
 
लेखकाने आपली लेखन शैली कायम राखावी
 
 
अविनाश आवलगावकर पुढे म्हणाले, भाषा ही मानवाला मिळालेली एक अनमोल भेट असल्याने प्रत्येक - लेखकाने आपली लेखन शैली कायम राखावी. लेखकांसाठी भाषा ही सर्वात शक्तिशाली माध्यम असल्याने आपले विचार, भावना, मते आणि अनुभव व्यक्त करण्याचे ते एक प्रभावी साधन होय.
 
 
तीनही ग्रंथात वैचारिक विचार
 
 
मानवी जीवनाचा विचार करणारे कवी म्हणजेच श्रीपाद जोशी होय. त्यांच्या पुस्तकातील लेख प्रेरणादायी असल्याचे डॉ. शैलेंद्र लेंडे म्हणाले. वास्तव यात मांडले असल्याचे कोमल ठाकरे म्हणाले. तीनही ग्रंथात वैचारिक विचार असल्याचे वि.स.जोग म्हणाले. आपल्या जीवनात आपण वेगवेगळया भूमिकेत वावरत असतो. भाषा आणि विचार आपणास कळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट मत श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले.