बंगळुरू,
Confidant Group Chairman C. J. Roy's suicide बंगळुरूमध्ये आयकर विभागाच्या छापेमारीनंतर एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉन्फिडंट ग्रुपचे अध्यक्ष आणि चेअरमन सी. जे. रॉय यांनी बंगळुरुतील त्यांच्या कार्यालयात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने कर्नाटकसह व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने गुरुवारी सकाळी सी. जे. रॉय यांच्याशी संबंधित विविध कंपन्यांवर छापेमारी सुरू केली होती. या कारवाईदरम्यान उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त संपत्ती आणि मालमत्तेचे पुरावे आढळल्याची माहिती समोर आली आहे.

छापेमारी आणि चौकशीमुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. बंगळुरुच्या अशोक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कार्यालयात सी. जे. रॉय यांनी स्वतःवर गोळी झाडली. घटनेनंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती बंगळुरुचे पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंग यांनी दिली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आयकर विभागाचं पथक सी. जे. रॉय यांच्याशी संबंधित व्यवहारांची तपासणी करत होतं. दरम्यान, पोलीस त्यांच्या परदेशात असलेल्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचंही सांगण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास सुरू असून सर्व बाबींचा सखोल तपास केला जात आहे. सी. जे. रॉय हे मूळचे केरळमधील असून कोची येथे त्यांचं वास्तव्य होतं. बांधकाम क्षेत्रासोबतच ते मल्याळम चित्रपटसृष्टीतही सक्रिय होते. अभिनेता मोहनलाल यांचा बिग बजेट चित्रपट ‘कॅसानोव्हा’ यासह काही चित्रपटांच्या निर्मितीत त्यांचा सहभाग होता. कॉन्फिडंट ग्रुप कर्नाटक आणि केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून, या घटनेमुळे उद्योगजगतात शोककळा पसरली आहे.