अभय इंगळे
दिग्रस,
grow-capital-financial-fraud-case : ग्रो कॅपिटल आर्थिक फसवणूक प्रकरणात तपास कार्याने गती घेतली असून मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या फरार संशयित आरोपी मंदार गिरीश दुधे याला अटक करण्यात पुसद पोलिसांना यश आले आहे. तर दुसरी फरार आरोपी अपर्णा विनोद दुधे हिचा अटकपूर्व जामीन दारव्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. अटकेतील आरोपी विनोद दुधे याची अपर्णा ही पत्नी असून मंदार हा मुख्य सूत्रधार गिरीश दुधे याचा मुलगा आहे. दोन दिवसांपूर्वी पुसद पोलिसांनी दिग्रस येथील आरोपी आणि नातेवाईकांच्या घरी धाड टाकली असता मंदार दुधेला त्याच्या घरून अटक करण्यात आली.
अपर्णाच्या माहेरी टाकलेल्या धाडीत मात्र ती सापडली नाही. काल मंदारला दारव्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने मंदार दुधे याला 5 फेब्रुवारी 2026 पर्यंत सहा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या त्याला तपास कामी पुसद पोलिसांच्याच ताब्यात ठेवण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन यांच्याकडे पोलिस अधीक्षकांनी हा तपास सोपविला असून त्यांच्या मार्गदर्शनात तपास कार्य वेगाने सुरू आहे.
यापूर्वी गिरीश दुधे व विनोद दुधे या दोन भावांना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेले आहे. त्यानंतरही चार आरोपी फरार होते. मात्र आता एकामागून एक कारवाई सुरू झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये समाधान आहे. सुमारे 7 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या फसवणुकीत अडकलेल्या 37 हून अधिक शिक्षक व नागरिकांच्या दृष्टीने ही मोठी घडामोड मानली जात आहे. मंदार दुधे हा अल्फा एक्सिम कंपनीचा मालक असून गुंतवणूक रकमेच्या व्यवहारात सक्रिय असल्याचे थेट पुरावे तपासात समोर आले आहेत. त्याच्या या कंपनीच्या बँक खात्यात लाखो रुपयांची उलाढाल झालेली आहे. त्यामुळे त्याच्या अटकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
दुसरी फरार आरोपी अपर्णा दुधे हिचा अटकपूर्व जामीन दारव्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यामुळे आता तिच्यावरही अटकेची टांगती तलवार असून, पुढील काही दिवसांत पोलिसांकडून आणखी धडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या प्रकरणातील इतर फरार आरोपी ग्रो कॅपिटल कंपनीचा मालक मनोज उर्फ विश्वास पाटील आणि विश्वांजली व्हेंचर्स कंपनीची मालक पुष्पांजली रंधेरिया यांचाही शोध युद्धपातळीवर सुरू आहे. त्यांनाही लवकरच गजाआड करण्यात येईल, असा विश्वास तपास यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला आहे. बुडालेल्या पैशांच्या वसुलीसाठी पोलिस काय पाऊल उचलतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
अल्फा एक्सिम कंपनीचा सहभाग
मंदार दुधे याच्या नावाने अल्फा एक्सिम कंपनी नोंदविण्यात आली असून नोव्हेंबर 2024 पासूनच कंपनीने आपला कागदोपत्री व्यवहार सुरू केला होता. कंपनीच्या बँक खात्यातून आर्थिक व्यवहार चालत होता. बँकेतील त्याच्या खात्यातून लाखोंची आर्थिक उलाढाल झालेली आहे. अनेक गुंतवणूकदारांनी या खात्यात थेट गुंतवणूक केली असून त्यातून काही गुंतवणूकदारांना परतावासुद्धा देण्यात आला आहे. शिवाय या खात्याचे धनादेशसुद्धा त्याने गुंतवणूकदारांना जामीन म्हणून दिल्याचे समोर आले आहे.