हा महामार्ग सुरक्षित न केल्यास आंदोलन : आ. बाळासाहेब मांगुळकर

31 Jan 2026 21:24:17
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 31 जानेवारी
balasaheb-mangulkar : यवतमाळ शहराजवळून गेलेला नागपूर-तुळजापूर महामार्ग असुरक्षित झाला असून उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरात येणाèया मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या कामामुळे आर्णी मार्गावरील निर्माणाधीन उड्डाणपुलाजवळ अनेकांचा बळी गेला आहे, तर कित्येक नागरिक जखमी झाले आहेत. शहरालगतचे हे मार्ग सुरक्षित न केल्यास रस्ता रोखो आंदोलन करण्याचा इशारा आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी पत्रपरिषदेत दिला.
 
 
y31Jan-Mahamarg
 
शनिवार, 31 जानेवारी रोजी घेतलेल्या या पत्रपरिषदेत आ. मांगुळकर यांच्यासह नगर परिषद काँग्रेस गटनेत्या वैशाली सवई, रमेश भिसनकर, प्रमोद बगाडे व काँग्रेसचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
या संदर्भात 26 जून 2025 रोजी डीपीडीसीच्या बैठकीत तर 22 सप्टेंबर 2025 रोजी दिशा कमेटीत या उड्डाणपुलासंबंधात विषय मांडला होता. यावेळी पालकमंत्री संजय राठोड व खासदार संजय देशमुख या दोघांनाही परिस्थितीची जाणीव करून देत शहरात प्रवेश करताना महामार्गाच्या दुतर्फा असलेले रस्ते पक्के करून द्या, अशी मागणी केली होती. मात्र दोघांनीही याकडे दुर्लक्ष केल्याची खंत आ. मांगुळकर यांनी पत्रपरिषदेत बोलून दाखवली.
 
 
तसेच सद्यस्थितीत काम सुरू असलेल्या आर्णी, नागपूर व भोयर बायपास जवळ योग्य दिशादर्शक फलक नसल्याने अनेक नागरिकांना नेमका रस्ता कोणता हेच लक्षात येत नसल्याने ते भलत्याच मार्गाने जात असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
तसेच स्टेट बँक चौक व इतर चौकातील सिग्नलही सुरू करण्यात यावे अशी मागणी आ. बाळासाहेब मांगुळकर यांनी केली.
पांढरकवड्यातील अवैध व्यवसायी यवतमाळात
 
 
शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यास पोलिस दलाला यश आले असले तरी अवैध व्यवसाय मात्र मोठ्या प्रमाणात फैलावल्याचे आ. बाळासाहेब मांगुळकर यांनी सांगितले. आठवडी बाजारातील महिला स्वच्छतागृहाच्या बाजूलाच मटका सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहरात अनेक ठिकाणी भिंगरी, चक्रीसारखे व्यवसाय सुरू असून यात पांढरकवडा येथील व्यवसायी उतरल्याचे ते म्हणाले. तसेच अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण आणण्याची त्यांनी मागणी केली आहे.
Powered By Sangraha 9.0