पुणे,
Pune college student attack, वाघोलीतील बकोरी फाटा येथे महाविद्यालयीन तरुणावर जुन्या भांडणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दहशत पसरवणाऱ्या गुंडांवर वाघोली पोलिसांनी छापा टाकला आणि त्याच परिसरात त्यांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या सहा आरोपींची नावे अशी आहेत – अमन उर्फ मुन्ना दस्तगीर पटे (२५), ईशप्प उर्फ विशाल जगन्नाथ पंदी (२४), मंगेश भगवान निखाते (२३), जिवक संजय ओव्हाळ (२०), आदित्य बापू शिंदे (२५) आणि ओम प्रवीण कुसाळकर (२०, सर्व रा. वाघोली).
याबाबत संघर्ष सुनील सातव (रा. वाघोली) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्याचे मित्र बकोरी फाटा येथील एका गेमझोनमध्ये पुलटेबल खेळत असताना आरोपी तेथे आले आणि पूर्वीच्या भांडणाच्या रागातून त्यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला.
वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सांगितले की, मुन्ना पटे आणि विशाल पंदी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याआधी या भागातील महाविद्यालयीन परिसरात या आरोपींनी तरुणांना मारहाण करून आपली दहशत पसरवली होती सध्या अटक केलेल्या आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू ठेवला आहे.