फास्टॅग अडचणीमुळे एसटी बस प्रवाशांच्या डोक्याला ताप

    दिनांक :31-Jan-2026
Total Views |
पुणे,
Pune ST Bus सांगलीहून पुण्याकडे येणाऱ्या एसटी बसचा फास्टॅग वारंवार स्कॅन न होण्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. खेड-शिवापूर टोलनाक्यावर फास्टॅग पूर्णपणे निष्क्रिय ठरल्याने बस तब्बल पाऊण तास थांबवून ठेवण्यात आली. यामुळे प्रवाशांचा मौल्यवान वेळ वाया गेला आणि अनेकांना नियोजित कार्यक्रमांमध्ये अडचण आली.
 
 
dghrtf
बिबवेवाडी येथील रहिवासी विजय आकुर्डेकर हे पत्नीसमवेत पाच-सहा दिवसांपूर्वी सांगली-स्वारगेट एसटी बसने प्रवास करत होते. बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते. प्रवासाच्या सुरुवातीला पहिल्या टोलनाक्यावर फास्टॅग स्कॅन होण्यात विलंब झाला, तर पुढील टोलनाक्यावरही अशीच परिस्थिती दिसून आली. मात्र, खेड-शिवापूर टोलनाक्यावर फास्टॅग पूर्णपणे निष्क्रिय असल्याने बस थांबवली गेली.टोल कर्मचाऱ्यांनी रोख रक्कम भरल्याशिवाय बस पुढे सोडण्यास नकार दिला, परंतु नियमांनुसार रोख पैसे भरणे शक्य नसल्याचे चालक व वाहकांनी स्पष्ट केले. परिणामी, टोलनाक्यावर वाहनांची लांबच लांब रांग लागली. मागील वाहनचालकांच्या सततच्या हॉर्नमुळे वातावरण तणावपूर्ण झाले आणि प्रवाशांचा संयम सुटू लागला.
अखेर प्रवाशांनी एसटीच्या हेल्पलाइनवर संपर्क साधून अडचण कळवली. तोडगा निघेपर्यंत आणखी दहा ते पंधरा मिनिटांचा विलंब झाला. जवळपास पाऊण तासानंतर बस अखेर पुढे रवाना झाली.