मुंबई
Sanjay Raut बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तसेच राष्ट्रवादीकडे असलेली खाती पक्षाकडेच ठेवण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आज सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
या घडामोडींवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या सगळ्या प्रक्रियेची सूत्रे नेमकी कुणाच्या हातात आहेत, यावर भाष्य करताना राऊत यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नाव घेत मोठा दावा केला आहे.संजय राऊत म्हणाले की, राज्याला अजूनही अजित पवार यांच्या निधनाच्या दु:खातून सावरण्याची संधी मिळालेली नाही. अशा वेळी त्यांच्या कुटुंबातील कोणी उपमुख्यमंत्री होत असेल, तर तो त्यांच्या पक्षाचा आणि Sanjay Raut कुटुंबाचा विषय आहे. यावर प्रतिक्रिया देण्याची ही वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासारखे राष्ट्रीय स्तरावरील नेते आहेत. त्यांनी पक्षांतर्गत निर्णय घेतला असेल, तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र अखेरीस हा निर्णय अमित शाह यांनी घेतला असेल, असे मोठे वक्तव्य राऊत यांनी केले.
अजित पवारांचा पक्ष हा स्वतंत्र गट Sanjay Raut असल्याने सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवार यांनी व्यक्त केलेली अनभिज्ञता खरी असल्याचेही राऊत यांनी नमूद केले. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीतील तटकरे, भुजबळ, पटेल यांसारख्या नेत्यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन चर्चा केली आणि तिथेच हा निर्णय झाला असावा, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.भारतीय जनता पक्षावर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, भाजप हा मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा पक्ष आहे. दुखवटा आणि दु:ख यांच्याशी या पक्षाचा कधी संबंध राहिलेला नाही. मात्र तरीही, सध्या या विषयावर अधिक बोलण्याची ही वेळ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता होती, असे शरद पवार यांच्या वक्तव्यावरून जाणवत असल्याचे राऊत म्हणाले. पुढे काय होईल, याबाबत सध्या काही भाष्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.भाजपच्या राजकीय भूमिकेवर आणखी टीका करताना संजय राऊत म्हणाले की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना नेतृत्वहीन झाली आहे, असे सांगून भाजपने शिवसेना गिळण्याचा मोठा डाव आखला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी तो डाव उधळून लावला, आणि याचाच राग आजही भाजपला आहे, असा दावा त्यांनी केला.