संगारेड्डी
students poisoned after midday meal तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील कोणीजेर्ला मंडलमध्ये असलेल्या बोडियाथांडा सरकारी प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजनानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शाळेत दिलेलं जेवण घेतल्यानंतर एकूण ४५ विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला, त्यापैकी ३८ विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून दहा विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारच्या जेवणानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब आणि तीव्र पोटदुखीची लक्षणे दिसू लागली. अचानक अनेक मुलांची तब्येत खालावल्याचं लक्षात येताच शाळा प्रशासन, ग्रामस्थ आणि पालकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. बाधित विद्यार्थ्यांना खम्मम येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं असून सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे मध्यान्ह भोजन योजनेच्या अंमलबजावणीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सरकारी प्राथमिक शाळांमध्ये राबवली जाणारी ही योजना मुलांची भूक भागवणे, पोषण सुधारणा करणे आणि शाळेतील उपस्थिती वाढवणे या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांसाठी ही योजना आधार ठरते, कारण अनेक विद्यार्थी रिकाम्या पोटी शाळेत येतात. मध्यान्ह भोजनामुळे सामाजिक समतेलाही चालना मिळते. सर्व मुले एकत्र बसून जेवतात, त्यामुळे जात आणि वर्गभेद कमी होतात तसेच मुलींच्या शिक्षणालाही प्रोत्साहन मिळतं. मात्र अशा योजनेंतर्गत दिलेल्या अन्नामुळेच मुलांच्या जीवाला धोका निर्माण होणं ही गंभीर बाब मानली जात आहे.
यापूर्वीही विविध ठिकाणी निकृष्ट दर्जाचं अन्न आणि स्वच्छतेअभावी मुलांना विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गरीब आणि लहान मुले अनेकदा तक्रार करू शकत नाहीत, याचा गैरफायदा घेत अन्नाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून केली जात असून प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.