तिवसा,
tivasa-mla-cup-kabaddi-tournament : देशाचे माजी पंतप्रधान, थोर राष्ट्रनेते आणि क्रीडाप्रेमी श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त क्रीडाक्षेत्राच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीचा संदेश देणारी आधार फाउंडेशन, अमरावती यांच्या वतीने आयोजित आमदार चषक - २०२६ अखिल भारतीय खुली महिला व पुरुष कबड्डी स्पर्धा तिवसा येथे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात सुरू झाली.

स्पर्धेच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपस्थित मान्यवर व खेळाडूंनी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यास क्रीडाप्रेमी नागरिक, ग्रामीण भागातील तरुण खेळाडू, विविध जिल्ह्यांतून आलेले संघ तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार अनिल बोंडे यांनी विकासाची नवी व्याख्या मांडली. ते म्हणाले, एखाद्या मतदारसंघात किती रस्ते झाले, किती इमारती उभ्या राहिल्या यापेक्षाकिती सक्षम, शिस्तबद्ध, देशासाठी खेळणारे तरुण घडले, हेच खरे विकासाचे मोजमाप आहे. क्रीडा क्षेत्रातून राष्ट्रनिर्मिती घडते, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून राज्यात राबविण्यात येत असलेल्या नवीन क्रीडा धोरणाची माहिती देण्यात आली. या धोरणामुळे शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील खेळाडूंना अधिक प्रोत्साहन, वाढीव गुण तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होणार असल्याचे नमूद करण्यात आले. या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले प्रो-कबड्डी लीगचे दिग्गज खेळाडू प्रदीप नरवाल व राजेश नरवाल यांची उपस्थिती. त्यांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी तरुण खेळाडूंमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरुड विधानसभा क्षेत्राचे आमदार उमेश यावलकर होते. मंचावर नितीन गुडधे, आरती राजेश वानखडे, छाया दंडाळे, प्रदीप गौरखेडे, निलेश श्रीखंडे, संजय देशमुख, सुभाष श्रीखंडे यांच्यासह अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. श्रीधर देशमुख, अनिल थुल, सागर शृंगाने, दत्ता माळोदे, भूपेंद्र ठाकूर, मयुरी राऊत, विक्रम जोशी, अनिल कडू, विवेक गुल्हाने, अजय गुल्हाने, अंकुश देशमुख, आदींची उपस्थिती लाभली. सूत्रसंचालन कपिल निर्गुण यांनी प्रभावीपणे केले, तर सचिन राऊत यांनी आभार मानले.