डिजिटल लॉकमुळे घरफोडीचा डाव फसला

04 Jan 2026 21:40:03
तभा वृत्तसेवा
घाटंजी, 
burglary-attempt : शहरात घरफोडीच्या उद्देशाने शिरलेल्या चोरट्यांचा डिजिटल लॉकमुळे डाव फसला. त्यामुळे घरातील लाखोंचा ऐवज सुरक्षित राहिला. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
 
 
 
HKJH
 
 
 
इसुब हारून नगरिया हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. 1 जानेवारी रोजी रात्री घरी परतल्यावर त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची साखळी तुटलेली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश केल्यानंतर सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. चोरट्यांनी कपाटे उचकटून लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, लॉकरला पासवर्ड असलेले डिजिटल लॉक असल्याने ते उघडण्यात चोरट्यांना अपयश आल्याने रोकड व मौल्यवान दागिने सुरक्षित राहिले.
 
 
3 जानेवारी रोजी नगरिया यांनी घाटंजी पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीला जेरबंद केले. ही कारवाई पोलिस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी राहुल खंडागळे व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे शहरात समाधान व्यक्त होत आहे.
Powered By Sangraha 9.0