नागपूर,
nagpur-weather : गेल्या दोन दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने थंडीची तीव्रता कमी झाली आहे. ढगांच्या आच्छादनामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ झाली आहे. नागपूरचे तापमान १५.२ अंश सेल्सिअस नोंदविले असून बहुतांश भागांत तापमान १२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे निरीक्षण हवामान विभागाने नोंदवले आहे.
सध्या थंडीची तीव्र लाट नसली तरी हिवाळ्याची चाहूल पहाटे आणि रात्री कायम आहे. दिवसा मात्र उन्हाचा कडाका वाढत जाण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहे. हवामानातील अचानक बदलाचा आरोग्यावर परिणाम होण्याची असल्याने विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी पहाटे व रात्री गरम कपड्यांचा वापर करावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पुढील काही दिवस हवामान मुख्यतः कोरडे राहणार असून आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज आहे. नागपूरसारख्या शहरांमध्ये किमान तापमान १५ अंश, तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला हवामानात लक्षणीय बदल जाणवू लागले आहेत. गेल्या काही दिवसांतील कडाक्याच्या थंडीनंतर आता अनेक भागांत उन्हाचा कडाका वाढत आहे. दक्षिणेकडून येणार्या ढगाळ हवामानाचा परिणाम म्हणून किमान तापमानात वाढ नोंदवली जात आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत कडाक्याची थंडी परतण्याची शक्यता कमी असून किमान तापमान जास्त राहील. मात्र, पहाटे रात्री गारठा जाणवण्याची शक्यता आहे.