देवाभाऊच्या ‘रोड शो’ला जनतेचा प्रतिसाद

04 Jan 2026 20:14:29
अमरावती,
devendra-fadnavis : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दुपारी अमरावतीत ‘रोड शो’ केला. त्याला जनतेने उत्सफूर्त प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत झाले.
 
 
 
CM
 
 
 
देवाभाऊचे दुपारी पावणे दोन वाजता शहरातल्या पंवचटी चौकात आगमन झाले. तेथूनच वाजत - गाजत व कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत रोड शोला सुरूवात झाली. खुल्या जीपमध्ये देवाभाऊ विराजमान झाले होते. त्यांच्यासोबत खा. अनिल बोंडे, शहराध्यक्ष डॉ. नितिन धांडे, भाजपा नेत्या नवनीत राणा, प्रवीण पोटे, आ. केवलराम काळे, आ. राजेश वानखडे, अ‍ॅड. प्रशांत देशपांडे यांच्यासह अन्य नेते होते. त्यांच्या मागे असलेल्या अन्य एका खुल्या वाहनात निवडणूक प्रमुख जयंत डेहनकर, प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, प्रा. दिनेश सूर्यवंशी, रवींद्र खांडेकर, किरण पातुरकर, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख व अन्य नेते होते. डिजेवर भाजपा व देवाभाऊ यांच्यावर तयार करण्यात आलेली लक्षवेधून घेणारी गाणी वाजत होती. या गाण्यांनी छान वातावरण निर्मिती झाली.
 
 
गाडगे नगरात फटाक्यांच्या आतषबाजीत कार्यकर्त्यानी देवाभाऊंचे स्वागत केले. पुढे शेगाव नाका येथील प्रभागात निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांनी व नागरिकांनी जंगी स्वागत केले. विलास नगर, रामपुरी कॅम्प, चौधरी चौक, जयस्तंभ चौक, श्याम चौक आणि राजकमल चौकात देवाभाऊचे जोरदार स्वागत झाले. या सर्व ठिकाणी त्या-त्या भागातले उमेदवार आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह हजर होते. काही ठिकणी ढोलताशे सुद्धा वाजत होते. रस्त्यावरच्या दुभाजकावर भाजपाचे झेंडे, देवाभाऊचे होर्डींग लावण्यात आले होते. काही ठिकाणी पताका देखील लावल्या होत्या. त्यामुळे रोड शोचा मार्ग भाजपामय झाला होता. निवडणूक निरीक्षक आमदार संजय कुटे संपूर्णवेळ नियोजनात होते. विशेष म्हणजे ते पोलिस आयुक्त राकेश ओला व त्यांच्या चमू सोबत पायदळ चालले. पुढे रोड शो गांधी चौकात पोहोचला. तेथे तुफान गर्दी होती. अंबा व एकविरा देवी मंदिरासमोर येताच देवाभाऊंनी आशीर्वाद घेतले व मंदीर पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. गौरक्षण चौकात देवाभाऊ रोड शोच्या गाडीतून खाली उतरले व त्यांच्यासाठी असलेल्या वाहनात बसून ते रोड शोसाठी ठरविण्यात आलेल्या मार्गावरूनच साईनगरकडे रवाना झाले. तेथे त्यांनी पत्रकारांशी व उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. देवाभाऊच्या रोड शोने अमरावती चांगली वातावरण निर्मिती झाली असून भाजपा उमेदवारांना बळ मिळाले आहे.
 
 
अमरावतीच्या विकासाची जबाबदारी आमची : मुख्यमंत्री
 
 
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ अमरावतीतल्या ’रोड शो’ला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यावरून हे लक्षात येते की या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार आहे. गेल्यावेळी भाजपाकडे सत्ता होती, त्या काळात अनेक योजना भाजपाने राबवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अमृत योजनेच्या ९३१ कोटीच्या निधीतून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. रस्ते विकासासाठी २१२ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला. अमरावतीत लवकरच विमान प्रशिक्षण संस्था सुरु होत असून त्याचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. बडनेरा सांस्कृतिक भवन, बससेवा, वेगवेगळ्या प्रकारचे सुशोभीकरण अशा अनेक गोष्टी भाजपाच्या कारकिर्दीत पूर्ण करण्यात आल्या. राज्य सरकारने २०० कोटी रुपयांच्या अंबादेवी प्रकल्पाला मान्यता दिली आहे. साईनगरात क्रिडा व नाट्य संकुल होणार आहे. आम्ही केवळ आश्वासनांवर नव्हे, तर केलेल्या कामांवर आणि पुढील स्पष्ट व्हिजनवर मते मागत आहोत. अमरावतीला आधुनिक, रोजगारक्षम आणि विकसित शहर बनवण्याचा आमचा संकल्प आहे. येत्या १५ तारखेला भाजपाची जबाबदारी तुम्ही घ्या, पुढची ५ वर्षे तुमच्या शहराच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
Powered By Sangraha 9.0