समाजात एकोप्याची गरज

-अलका इनामदार यांचे प्रतिपादन -राष्ट्रसेविका समितीचा मकर संक्रमणोत्सव, पथसंचलना

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
नागपूर, 
alka-inamdar : विविध बाबतीत समाजात दुफळी (बायनरीज) निर्माण करण्याचा प्रयत्न विशेषत्वाने केला जात असून या षड््यंत्रापासून सावध रहात समाजात एकोप्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या अ.भा. सहकार्यवाहिका अलका इनामदार यांनी आज येथे केले.
 
 

04jan1555 
 
 
 
राष्ट्रसेविका समितीच्या महानगरातील सेविकांचे पथसंचलन व मकरसंक्रमण उत्सव आज सुभाषनगरातील नेल्को सोसायटीच्या मैदानावर उत्साहात झाला. रेडिओ ऑरेंजच्या संचालक व सीईओ इनु मुजुमदार, महानगर कार्यवाहिका करुणा साठे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
 
 
आपल्या प्रेरक उद््बोधनात अलका इनामदार म्हणाल्या की, आज आपल्या समाजात मुठभर लोक सोडले तर बाकी सर्व समाज आर्थिकता व भौतिकतेच्या व्यामोहात जखडला जात आहे. प्रत्येक व्यक्तीसमोर एकच लक्ष्य आहे, शिक्षण कशासाठी तर पॅकेजसाठी.
 
 
शिक्षण शिकण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी घेतले जात नाहीय. जास्त पॅकेज मिळेल त्या विषयात शिक्षण. डॉलरसोबत तेथील संस्कृतीही येते. हे समाजावर होणारे सांस्कृतिक आक्रमण घातक आहे. तो दिसत नाहीय. ब्रिटिशांचेही सांस्कृतिक आक्रमण झाले. ते निदर्शनास यायला वेळ लागला. नंतर देश स्वतंत्र झाला. तरीही आज नागरिकांना स्वदेश भाव अंतरंगात जागवा, असे आवाहन का केले जातेय? कारण डॉलरसोबत तेथील संस्कृती येत असून मानसिक गुलामगिरीकडे जाऊ लागलो आहोत. ही चिंतन करण्याची बाब आहे.
 
 
आपण कुणीकडे जात आहोत, आनंद कशात आहे, सुख म्हणजे काय, याचा विचार केला तर निदर्शनास येईल की, आपण चुकीने भौतिक साधनांनाच सुख समजतो आहोत. त्यातच आनंद शोधतो आहोत. यातून केवळ आपली इच्छा-आकांक्षा वाढती आहे. स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, मालक-नोकर वगैरे विविध बाबींवर समाजात दुफळी (बायनरीज) निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय व आपण त्यास बळी पडत आहोत.
 
 
समाजात एकोप्याची गरज आहे. हिंदू जीवनपद्धतीचा अवलंब हा त्यावर उपाय आहे. कारण त्यात विश्वकल्याण आहे, असे अलका इनामदार म्हणाल्या. कार्यक्रमाला अनेक महिला, पुरुष नागरिक उपस्थित होते.
 
इनु मुजुमदार
 
 
पथसंचलन पाहून स्तंभित झाली असल्याचे प्रारंभीच नमूद करून इनु मुजुमदार म्हणाल्या, प्रत्येकाच्या जीवनात कुठल्या ना कुठल्या प्रकारचा संघर्ष असतो. स्त्रियांच्या या संघर्षाचा सन्मान करते. देशासाठी कुणी संघर्ष करतो, हे आज मी पाहत आहे. मनापासून इच्छित सकारात्मक बाब पूर्ण होते, असा अनुभव तुम्हालाही आला असेल. बालिकांपासून आजीपर्यंत सर्वच इथे आल्या आहेत. साèया चिंता सोडून त्या देशात जनजागरणासाठी एकत्र आल्या आहेत, हीच मोठी बाब आहे. प्रत्येकाने सकारात्मक ऊर्जेने देशासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
 
 
मकरसंक्रमणानिमित्ताने महानगरातील शेकडो सेवकांनी आज सायंकाळी पथसंचलन केले. बालिका, तरुणी व महिला संपूर्ण गणवेशात सहभागी झाल्या होत्या. घोषाच्या तालात निघालेल्या या पथसंचलनाचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले. नेल्को सोेसायटीच्या मैदानातून निघून कॉसमॉस टाऊन, आझाद हिंद चौक, मंगलमूर्ती चौक, सुर्वेनगर, त्रिमूर्तीनगरमार्गे याच मैदानावर ते परत आले. भारतीय स्त्री शक्ती, संस्कृत भारती आदींसह अनेक नागरिकांनी पथसंचलनावर पुष्पवर्षाव केला. नागरिकांनी घरासमोर सडासंमार्जन करून रांगोळ्या काढल्या होता. ‘भारत माता की जय’ घोषणा नागरिक देत होते. रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांनीसुद्धा स्वागत केले.