यवतमाळच्या नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांचा नागरी सत्कार

04 Jan 2026 21:32:33
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
priyadarshini-uike : नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भरघोस मताधिक्याने निवडून आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नप अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी अशोक उईके यांचा आदिवासी समाजातील वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
 

y4Jan-Nagari-Satkaar 
 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिरसा क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी होते. तर सेवानिवृत्त आयुक्त नरेंद्र पोयाम यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिरवा सुका लिंगो, सावित्रीबाई फुले व जयपाल सिंह मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
 
 
नागरी सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित नप अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांनी, मी एक उच्चशिक्षित महिला असून मला तळागाळातील महिलांची जाणीव आहे. तसेच कायद्याची अभ्यासक असल्यामुळे मी गरजू व सामान्य माणसाकरिता चांगल्या पद्धतीने काम करू शकते. मला नप अध्यक्ष म्हणून निवडून देऊन समाजाने माझ्यावरती जो विश्वास दाखविला त्याला मी तडा जाऊ देणार नाही, असे सांगितले.
 
 
नरेंद्र पोयाम यांनी, अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके समाजाची नाळ ओळखू शकतात व कुशलतेने नगरपरिषदेचा कार्यभार सांभाळून शहराला एक नवीन ओळख देऊ शकतात, असा विश्वास प्रकट केला. दशरथ मडावी यांनी, एक कायदे तज्ञ नप अध्यक्ष या शहराला मिळाल्यामुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निकाली लागेल. महिलेच्या नजरेमध्ये घर जितके सुरेख आणि स्वच्छ राहते तितकेच आता शहरही स्वच्छ होईल असा विश्वास व्यक्त केला.
 
 
यावेळी संविधान चौक ते बालकृष्ण मंगल कार्यालय, बिरसा मुंडा चौकमार्गे शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये पारंपारिक वाद्य व वेशभूषा केलेले हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. तसेच आदिवासी गायक तथा सिने कलावंत पांडुरंग मेश्राम व रवी मेश्राम यांच्या आदिवासी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
 
कार्यक्रम प्रसंगी बिना अशोक उईके, एमके कोडापे, नरेश गेडाम, राजू मडावी, अ‍ॅड. प्रमोद घोडाम, डॉ. शीतल चंद्रशेखर मडावी, सेवानिवृत्त अप्पर पोलिस अधीक्षक अशोक मेश्राम, मंदा माणिक मडावी, अ‍ॅड. विकास कुळसंगे, विवेक नागभिडे, प्रल्हाद सिडाम, पवनकुमार अत्राम, श्रीधर कनाके, डॉ. देव कनाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
कार्यक्रमाचे संचालन वैशाली आत्राम यांनी केले. तर प्रास्ताविक व आभारप्रदर्शन तुषार आत्राम यांनी केले. कार्यक्रमासाठी बंडू मेश्राम, नंदकिशोर अर्के, बालाजी वाकोडे, किशोर सलामे, प्रफुल आडे, राजेश गेडाम, अरुण पोयाम, बंडू केळकर, बंडू राजगडकर, अशोक गेडाम, सुभाष गेडाम, लोभेश कुळसंगे, रजनी गेडाम, सुनीता कुडमते, योगिता पेंदोर, लखन पेंदोर, निलेश चांदेकर, पवन मंगाम, विजय मडकाम यांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0