मुलांचे मन स्थिर ठेवण्यासाठी शिक्षकांनी योगअभ्यासाचे धडे द्यावे

- डॉ. संजय मालपाणी यांचा मौलिक सल्ला - स्व. रमाबाई रानडे स्मृती व्याख्यानमाला

    दिनांक :04-Jan-2026
Total Views |
नागपूर, 
sanjay-malpani : विद्यार्थ्यांचे मन चंचल असल्याने शिक्षकांनी मुलांचे मन स्थिर ठेवण्यासाठी सर्वप्रथम योगअभ्यास शिकवावा. यात प्रामुख्याने वर्गात ताठ बसण्याचे धडे द्यावेत. शाळेत अभ्यास करताना सरळ बसण्याचे अनेक फायदे आहेत. ताठ बसल्यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते, आपला आत्मविश्वास वाढतो. सरळ बसल्याने विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने आणि उत्साहाने अभ्यासात मन लावतो, असे स्पष्ट प्रतिपादन परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.
 
 


K

 
 
 
 
उत्तर अंबाझरी मार्गावरील सेवासदन शिक्षण संस्थेच्या शतसंवत्सरीय वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. डॉ. वसंतराव व डॉ. कुसुमताई वांकर पुरस्कृत ४० व्या रमाबाई रानडे स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गीता परिवार संगमनेरचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी ‘जानो गीता-बनो विजेता’ या मार्गदर्शन केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्लास्टो टँकचे संचालक विशाल अग्रवाल, सेवासदनच्या अध्यक्षा कांचन गडकरी, सचिव वासंती भागवत उपस्थित होत्या.
 
विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व फुलेल असे शिक्षण द्या
 
 
डॉ. संजय मालपाणी व्याख्यानात पुढे म्हणाले, आजच्या मोबाईलच्या काळात पालक मुलांकडून अधिक गुणांची अपेक्षा करतात. अभ्यास अभ्यास आणि शिकवणी वर्गामुळे मुलांचे व्यक्तिमत्त्व विकसित होत नाही. मुलांना मैदानी खेळांची सुध्दा सवय लावावी, केवळ आपल्या अपेक्षा न ठेवता मुलांच्या मनावरील ताणतणावाचा विचार करावा. चांगल्या वाईट अनुभवातून खुप काही शिकण्यासारखे आहे. आयुष्याची गणित सोडविण्याची सवय, मान-अपमान तसेच एखाद्या गोष्टीसाठी सरळ नाही म्हणून सांगण्याची सवय लावावी. घरात आणि शाळेत बालवयातच समत्व शिकविले पाहिजे. त्यातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व फुलेल आणि चांगले विद्यार्थी घडतील, असा विश्वास संजय मालपाणी यांनी व्यक्त केला.
 
स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार
 
 
प्रारंभी सेवासदन हायस्कूलच्या मुलींनी गीतेच्या १२ व्या अध्यायाचे पठण केले. संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी आणि सचिव वासंती भागवत यांनी डॉ. संजय मालपाणी यांना स्मृतिचिन्ह व संत ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा, तर विशाल अग्रवाल यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. अध्यक्षीय भाषणात विशाल अग्रवाल यांनी, मुलांनी शिक्षणानंतर वेल्थ क्रिएटर व जॉब क्रिएटर बनण्यासाठी उद्योग क्षेत्रात येण्याचे आवाहन केले.
 
 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत गंपावार, साधना हिंगवे आदींनी परिश्रम घेतले. या प्रसंगी निखिल गडकरी, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, प्रवचनकार विवेक घळसासी, आशुतोष अडोणी, संस्थेचे उपाध्यक्ष बापू भागवत, माजी कुलगुरू डॉ. चांदेकर, अ‍ॅड. उमेश अंधारे, डॉ. कल्पना उपाध्याय, मनीषा यमसनवार, संस्थेचे कोषाध्यक्ष कृष्णराव नेटके, प्रा. रमेश हिमते, अशोक तोतडे, आशुतोष शेवाळकर, रवींद्र कासखेडीकर आदी उपस्थित होते.