यवतमाळचे प्रलंबित नाट्यगृह लवकरच पूर्ण होईल : अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके

04 Jan 2026 21:29:03
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
priyadarshini-uike : यवतमाळ शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था, दैनंदिन वाहतूकीचा प्रश्न, अनेक वर्षांपासूनची पिण्याच्या पाण्याची समस्या, शहरात रात्रीची नियमित गस्त अशा अनेक समस्यांची मला जाणीव आहे. त्या सोडवण्याला माझे प्राधान्य राहील. तसेच वर्षानुवर्षे कामे प्रलंबित राहिल्यामुळे अपूर्ण असलेले यवतमाळचे नाट्यगृह लवकरच पूर्ण करू, अशी ग्वाही नवनिर्वाचित नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शनी उईके यांनी दिली.
 
 

y4Jan-Anandgani 
 
 
 
शायरीकार भाऊसाहेब पाटणकर यांच्या जन्मदिनानिमित्त बापूजी अणे महाविद्यालयात आयोजित ‘आनंदगाणी’ काव्यमैफिलीच्या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. एज्युकेशन सोसायटी, यवतमाळ यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संस्थेचे सचिव धनंजय पांडे यांनी भाऊसाहेब पाटणकर यांच्या गझल व कवितेचे स्मरण करुन, दरवर्षी होणारा हा कार्यक्रम सर्व यवतमाळकर काव्यरसिकांचा असल्याचे सांगितले.
 
 
कार्यक्रमात कवी बाबा देशपांडे, आशिष ढबाले, गजेंद्र कांबळे, नीलकृष्ण देशपांडे, प्रा. ज्ञानेश्वर गटकर व जयंत चावरे या निमंत्रित कवींनी कविता सादर केल्या. सुरुवातीला दिवंगत राज्यस्तरीय हास्यकवी मिर्झा रफी अहमद बेग यांना उपस्थितांनी श्रद्धांजली वाहिली. स्व. पाटणकरांच्या निवडक शायरीसह निवेदन डॉ. विवेक विश्वरुपे यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे यांनी मानले. कार्यक्रमाला विश्वस्त विवेक धर्माधिकारी, शिक्षक अतुल गंजीवाले, प्रा. डॉ. गणेश खंडेराव, प्रो. अर्चना देशपांडे, वैशाली वाठकर, कर्मचारी वैभव चौधरी, प्रीती तिवाडे यांच्यासह श्रोते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0