व्हेनेझुएलामधील अमेरिकन कारवाईत ३२ क्युबन अधिकाऱ्यांचा मृत्यू!

05 Jan 2026 09:29:56
काराकास,
32 Cuban officers died अमेरिकेच्या लष्करी कारवाईदरम्यान संबंधित देशातील ३२ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला लष्करी कारवाईच्या माध्यमातून अटक केल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यात तीव्र तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या आदेशानंतर व्हेनेझुएलामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी तैनाती करण्यात आली होती. मात्र, या सर्व तयारीनंतरही अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाची राजधानी कराकसवर हल्ला चढवत अध्यक्ष मादुरो यांना अटक केली आणि त्यांना अमेरिकेत नेले.
 
 
 
32 Cuban officers died
या कारवाईनंतर आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. वृत्तानुसार, या संपूर्ण लष्करी मोहिमेदरम्यान मोठ्या संख्येने क्युबन अधिकारी मारले गेले आहेत. क्युबन सरकारने रविवारी अधिकृतपणे याला दुजोरा दिला असून, व्हेनेझुएलामधील अमेरिकेच्या कारवाईत ३२ क्युबन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. क्युबन सरकारी दूरचित्रवाणीवर प्रसारित करण्यात आलेल्या निवेदनानुसार, व्हेनेझुएलाच्या सरकारच्या विनंतीवरून क्युबन लष्करी आणि पोलिस अधिकारी तेथे तैनात होते. व्हेनेझुएला सरकारचा क्युबा हा जवळचा मित्र मानला जातो आणि गेल्या काही वर्षांपासून क्युबा तेथे सुरक्षा व कारवाईसाठी लष्करी आणि पोलिस दल पाठवत आहे. या घटनेनंतर क्युबन सरकारने व्हेनेझुएलामध्ये मृत्युमुखी पडलेल्या अधिकाऱ्यांच्या स्मरणार्थ दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षा आणि संरक्षणाच्या जबाबदाऱ्यांशी निष्ठा राखत या अधिकाऱ्यांनी अत्यंत सन्मानाने आणि शौर्याने आपले कर्तव्य बजावले. हल्लेखोरांविरोधात थेट लढाई करताना किंवा महत्त्वाच्या ठिकाणांवर झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर तीव्र प्रतिकार करताना हे अधिकारी शहीद झाले, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
 
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही व्हेनेझुएलामधील या कारवाईदरम्यान क्युबन नागरिकांचा मृत्यू झाल्याची कबुली दिली आहे. ट्रम्प म्हणाले की, काल अनेक क्युबन लोक मृत्युमुखी पडले असून दुसऱ्या बाजूला मोठी हानी झाली आहे. मात्र, अमेरिकन सैन्याच्या बाजूने एकाही जवानाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा त्यांनी केला. सोमवारी बोलताना ट्रम्प यांनी ही कारवाई अत्यंत धोकादायक होती, असे सांगितले. काही अमेरिकी जवान जखमी झाले होते, परंतु सध्या सर्वजण सुरक्षित आहेत. एका हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले असले तरी सर्व उपकरणे परत आणण्यात आली असून अमेरिकेच्या बाजूने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0