निर्यात ही जिल्ह्याच्या आर्थिक विकासाची किल्ली ठरावी : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

05 Jan 2026 17:28:25
वाशीम,
Yogesh Kumbhejakar जिल्ह्यातील कृषी, प्रक्रिया उद्योग व स्थानिक उत्पादनांमध्ये मोठी निर्यात क्षमता आहे. उद्योजकांनी केवळ स्थानिक बाजारपेठेपुरते न थांबता जागतिक बाजारपेठेचा विचार करावा. निर्यात वाढल्यास रोजगारनिर्मितीला चालना मिळून जिल्ह्याचा सर्वांगीण आर्थिक विकास साधता येईल. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
 

Yogesh Kumbhejakar  
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाच्या निर्देशानुसार ‘महा निर्यात — इग्नाइट कन्व्हेन्शन २०२६’ या उपक्रमांतर्गत वाशीम येथे आयोजित जिल्हास्तरीय एकदिवसीय निर्यात कार्यशाळा उत्साहात व यशस्वीरीत्या संपन्न झाली. ही कार्यशाळा हॉटेल दानीश एम्पायर येथे पार पडली. कार्यक्रमाच्या उद्घानप्रसंगी जिल्हाधिकारी कुंभेजकर बोलत होते. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पुनम घूले, उद्योग सहसंचालक निलेश निकम, गणेश सोनवणे, एझेयुटीव ऑफिसर संकेत निनावे, अधीक्षक अभियंता व समन्वय अधिकारी, मैत्री कक्ष प्रियदर्शिनी सोनार, संदीप धोटे, अंकित गुप्ता, संकेत राजे, पोस्ट विभागाचे वरिष्ठ अधीक्षक सी. व्ही. रामा रेड्डी, सहाय्यक व्यवस्थापक उमेश रानोलिया, कृषी उपसंचालक हिना शेख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग सहसंचालक निलेश निकम यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी ‘महा निर्यात’ उपक्रमामागील शासनाची भूमिका स्पष्ट करताना, जिल्हास्तरावर निर्यातक्षम उद्योग उभारण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वाच्या असल्याचे नमूद केले. जिल्ह्यातील उद्योजकांनी या संधीचा लाभ घेऊन निर्यात क्षेत्रात पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यशाळेमध्ये निर्यात प्रक्रिया व नोंदणी, परदेशी बाजारपेठेत प्रवेश करण्याच्या संधी, निर्यात प्रोत्साहन योजना व शासकीय अनुदाने, कृषी व प्रक्रिया उद्योगांसाठी निर्यात क्षमता, एफपीओ व एमएसएमई साठी निर्यात धोरणे तसेच जिल्हा निर्यात केंद्र संकल्पना या विषयांवर तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित उद्योजकांच्या प्रश्नांना तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली. या कार्यशाळेत विदेश व्यापार संचालनालय, उद्योग विभाग, निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञ, वित्तीय संस्था प्रतिनिधी तसेच संबंधित शासकीय अधिकारी यांनी सहभाग घेतला. शासकीय योजनांचा प्रभावी वापर करून निर्यात व्यवसाय सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
समारोपप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक पुनम घुले यांनी उपस्थितांचे आभार मानत जिल्ह्यातील उद्योजकांनी निर्यात क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Powered By Sangraha 9.0