ट्रेकिंग दरम्यान विद्यार्थ्यांवर मधमाश्यांचा हल्ला...३५ हून अधिक जखमी

    दिनांक :05-Jan-2026
Total Views |
पुणे,
Trekking students attacked by bees पुण्यातील वेल्हे तालुक्यातील निसर्गरम्य मढेघाट परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर अचानक आग्या मोहोळाच्या मधमाशांनी हल्ला केला, ज्यामुळे ट्रेक करणाऱ्यांमध्ये पळापळ सुरू झाली. मढेघाट ते उपंडा असा ट्रेक करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, मात्र स्थानिक ग्रामस्थांच्या धैर्यामुळे कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. या ट्रेकसाठी खासगी साहसी क्लासच्या माध्यमातून सुमारे ५० हून अधिक विद्यार्थी आणि मार्गदर्शक आले होते. १४ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये मध्यभागी असलेल्या गर्द झाडीतून जात असताना मधमाशांचा हल्ला झाला. या धावपळीत ३५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्थानिकांनी सांगितल्याप्रमाणे, ८ ते १० विद्यार्थी गंभीर जखमी झाले, तर इतर २५ जणांना शरीरावर मधमाशांचे चावे लागले.
 
 
Trekking students attacked
 
घटनेची माहिती मिळताच तोरण माची हॉटेलचे मालक अभिजीत भेके यांनी मदतीसाठी सोशल मीडियावर आवाहन केले. यानंतर केळद गावचे माजी सरपंच रमेश शिंदे आणि इतर स्थानिकांनी कड्यामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले. जखमी विद्यार्थ्यांना खासगी वाहनांमधून वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. दंश झालेल्या विद्यार्थ्यांना वेदना, चक्कर, उलटी आणि चेहऱ्यावर सूज यासारखी लक्षणे आढळली. ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर ज्ञानेश्वर हिरास आणि त्यांच्या टीमने तातडीने उपचार सुरू केले. अधिक गंभीर २ विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले, तर उर्वरित सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी सांगितले.