वॉशिंग्टन,
Trump denies Kremlin allegations अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा दावा फेटाळून लावत स्पष्ट केले आहे की, गेल्या आठवड्यात झालेल्या ड्रोन हल्ल्यात युक्रेनने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केलेले नाही. अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर हा निष्कर्ष काढण्यात आल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. क्रेमलिनकडून करण्यात आलेल्या दाव्यांबाबत ट्रम्प यांनी सुरुवातीला तीव्र चिंता व्यक्त केली होती, मात्र आता त्यांनी त्या आरोपांना नकार दिला आहे.
फ्लोरिडामधील आपल्या निवासस्थानी दोन आठवड्यांचा मुक्काम आटोपून वॉशिंग्टनला परतताना ट्रम्प यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, “मला वाटत नाही की असा कोणताही हल्ला झाला.” युरोपियन अधिकाऱ्यांनी रशियाचा हा दावा शांतता चर्चांना कमकुवत करण्याचा मॉस्कोचा प्रयत्न असल्याचा आरोप केल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकेच्या भूमिकेबाबत भाष्य केले. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी याआधी दावा केला होता की, युक्रेनने वायव्य नोव्हगोरोड प्रदेशातील पुतिन यांच्या अधिकृत निवासस्थानावर ड्रोन हल्ला केला होता, मात्र रशियाच्या संरक्षण यंत्रणांनी हे ड्रोन हवेतच पाडले. युद्ध संपवण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांच्या काळात असा हल्ला केल्याबद्दल लावरोव्ह यांनी कीववर जोरदार टीका केली होती.
सुरुवातीला ट्रम्प यांनी रशियाच्या आरोपांवर विश्वास ठेवत प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी पत्रकारांना सांगितले होते की, पुतिन यांनी दूरध्वनी संभाषणात हा मुद्दा उपस्थित केला असून त्यामुळे आपण नाराज झालो असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र काही दिवसांतच ट्रम्प यांची भूमिका बदलल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर न्यू यॉर्क पोस्टमधील एका संपादकीयाची लिंक शेअर केली, ज्यामध्ये रशियाच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते आणि पुतिन यांच्यावर टीका करण्यात आली होती. युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी ट्रम्प सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे. या संघर्षाबाबत त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमिर झेलेन्स्की आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन या दोघांवरही वेळोवेळी टीका केली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी हा युद्धसंघर्ष एका दिवसात संपवू शकतो असा दावाही केला होता.