ट्रम्प पुन्हा आक्रमक...भारताला दिली नव्या करांची धमकी

05 Jan 2026 09:19:05
वॉशिंग्टन,
Trump is aggressive again अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदीच्या मुद्द्यावरून भारताला पुन्हा एकदा कर वाढवण्याची धमकी दिली आहे. सोमवार, ५ जानेवारी २०२६ रोजी व्हाईट हाऊसमधून प्रसिद्ध झालेल्या एका ऑडिओमध्ये ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, भारताने या प्रकरणात अमेरिकेला सहकार्य केले नाही, तर भारतावर नव्याने कर लादले जाऊ शकतात. त्यांच्या मते, भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिका नाराज असून याचे परिणाम व्यापारावर दिसून येऊ शकतात. ट्रम्प यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुकही केले. मोदी हे चांगले व्यक्तिमत्त्व असून भारत अमेरिकेला खूश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले.
 
 
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
 
 
पंतप्रधान मोदींना हे माहीत आहे की अमेरिका सध्या समाधानी नाही आणि अमेरिकेला खूश करणे भारतासाठी महत्त्वाचे आहे, असे ट्रम्प यांनी नमूद केले. भारत व्यवसाय करतो आणि त्यामुळेच अमेरिकेकडून भारतावर लवकरच कर वाढवले जाऊ शकतात, असे संकेतही त्यांनी दिले. यापूर्वी अमेरिकेने भारतावर एकूण ५० टक्के कर लादले होते, ज्यामध्ये २५ टक्के दंडात्मक कराचा समावेश होता. भारत रशियाकडून कच्चे तेल आयात करत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली होती. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, भारतावर लादण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी करवाढ आहे. सुरुवातीला हा करदर १० टक्के होता, नंतर ७ ऑगस्ट रोजी तो २५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आणि गेल्या वर्षाच्या अखेरीस तो थेट ५० टक्क्यांवर पोहोचला.
 
 
दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापक द्विपक्षीय व्यापार करारावर काम सुरू असून, या कराराचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होऊन सार्वजनिक होण्याची शक्यता आहे. मात्र, करवाढीच्या पार्श्वभूमीवर भारताच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या डिसेंबरमधील विश्लेषणानुसार, मे ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत भारताची अमेरिकेला होणारी निर्यात ३७.५ टक्क्यांनी घटली असून ती ८.८ अब्ज डॉलर्सवरून ५.५ अब्ज डॉलर्सवर आली आहे. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे.
Powered By Sangraha 9.0