नागपुरात मिनीगोल्फ स्पर्धेचे आयोजन

- आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या खेळाडूंचा गौरव

    दिनांक :06-Jan-2026
Total Views |
नागपूर, 
mini-golf-competition : उपराजधानी नागपुरात सुरू असलेल्या ११ व्या सब-ज्युनिअर व ज्युनिअर राष्ट्रीय मिनीगोल्फ स्पर्धेने क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक ५ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या मिनीगोल्फ खेळाडू व त्यांना घडविणाऱ्या प्रशिक्षकांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री यांचे स्वीय सहायक कुमार मसराम, रातुम नागपूर विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संभाजी भोसले, बिंझाणी सिटी कॉलेजचे क्रीडा संचालक डॉ. संजय चौधरी तसेच विद्यापीठाचे सिनेट सदस्य उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते खेळाडू व प्रशिक्षकांचा सन्मान झाल्याने वातावरणात चैतन्य पाहायला मिळाले.
 
 
kml
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या सौरव पिसे, नेहल बगमार, साक्षी लहाने, वंदना मिंज आणि आदी मिश्रा यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच मिनीगोल्फसारख्या तांत्रिक खेळात भारताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या प्रशिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. “योग्य सराव, शिस्त आणि जिद्द यामुळे भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय आव्हानांना समर्थपणे सामोरे जात आहेत,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. क्रीडा व शिक्षणाची सांगड विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्याचे मत कुमार मसराम यांनी मांडले.
 
 
दरम्यान, मिनीगोल्फ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित ज्युनियर मिनीगोल्फ नॉकआऊट स्पर्धेचे अंतिम निकालही जाहीर झाले. या स्पर्धेत मध्यप्रदेश संघाने सर्वाधिक सुवर्णपदके पटकावत वर्चस्व सिद्ध केले. मुलांच्या संघ स्पर्धेत मध्यप्रदेशला सुवर्ण, उत्तर प्रदेशला रौप्य तर महाराष्ट्राच्या दोन संघांना कांस्य पदक मिळाले. मुलांच्या एकेरीत महाराष्ट्राच्या पियुष गेडेकारेने सुवर्ण, तर दुहेरीत स्वयम खडके–श्रेयश मस्करी जोडीने सुवर्णपदक पटकावले. मुलींच्या गटात संघ स्पर्धेत मध्यप्रदेश अव्वल ठरला, तर एकेरीत महाराष्ट्राच्या वंशिका कलांबेने सुवर्णपदक जिंकले. मिक्स डबल्समध्येही मध्यप्रदेशने बाजी मारली. १५ राज्यांच्या सहभागाने सुरू असलेली ही स्पर्धा आणि सत्कार सोहळा युवा खेळाडूंना प्रेरणादायी ठरत असल्याचे आयोजकांनी सांगितले.