भाबडे भाषक भान

    दिनांक :06-Jan-2026
Total Views |
 
अग्रलेख
marathi literary conference मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे दुसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात संपन्न झाले. साताऱ्याचे संमेलन 99 वे होते. आता शंभरावे संमेलन पुण्यात होणार आहे. शेकडो वर्षे जुनी भाषा, तितकाच जुना साहित्य व्यवहार आणि 100 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची घोषणा या पृष्ठभूमीवर आपल्या माय मराठीच्या सद्य:स्थितीच्या संदर्भात वास्तववादी चिकित्सा करणे आवश्यक ठरते. यातील सर्वांत पहिला मुद्दा मराठी भाषेच्या भविष्याबद्दल आणि त्या भाषेतील विविध साहित्य प्रवाहांबद्दलच्या गळेकाढूपणाचा. आपली संमेलने, मग अखिल भारतीय असोत किंवा जिल्हा स्तरावरची असोत, ती गळेकाढूपणासाठी प्रसिद्ध आहेत. साताऱ्यातही तेच झाले. गर्दी चांगली होती. ग्रंथ विक्री चांगली झाली. पण, बव्हंशी सूर हा विविध विषयांवर चिंता व्यक्त करणारा. नपेक्षा ठरावांमध्ये काही चांगल्या बाबी आहेत. भाषेची सक्ती, मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा विषय, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील 865 गावांचा प्रश्न, ग्रंथपालांची पदे असे मुद्दे ठरावांमध्ये घेतले गेले हे छानच. परंतु, एकुणात आपली भाषक समज आणि भान हे भाबडे आणि भावनिक असल्याचेच पुन: एकवार अधोरेखित झाले. राज्यातील प्रत्येक बसस्थानक आणि नगरपालिकेत पुस्तकाच्या दुकानांना सवलतीची जागा देऊ वगैरे घोषणा झाल्या. त्यातून फार काही हाती पडणारे नाही हे आजच स्पष्ट आहे.
 
 

मराठी संमेलन  
 
 
आपण हुतात्म्यांची स्मारके केली, समाजभवने केली. त्यातून फार काही हाती लागले नाही. आता मराठीला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याच्या पृष्ठभूमीवर तिला व्यवहार भाषा आणि ज्ञानभाषा बनवण्याच्या दृष्टीने ठोस कृती कार्यक्रमही हाती घेतला गेलेला दिसत नाही. खरी चिंता व्यक्त करावी तो विषय हाच. जगात सात हजारावर भाषा बोलल्या जातात. चिनी-मँडेरिन, इंग्रजी, हिंदी, स्पॅनिश, अरबी या त्यातील प्रमुख भाषा. पाच ते दहा कोटी लोक ज्या भाषा बोलतात, त्या भाषांत मराठीचा समावेश आहे. तेलगू आणि तामिळ भाषाही त्यात आहे. त्यामुळे मराठी भाषा विलुप्त वगैरे होईल, अशी भीती व्यक्त करणे अनाठायी आहे. कोट्यवधी लोक जी भाषा बोलतात, ज्या भाषेत व्यवहार करतात, ज्या भाषेत मोठ्या प्रमाणात लेखन-वाचन-अध्ययन-अध्यापन होते, ती भाषा विलुप्त होण्याची शक्यताच नाही. खरा प्रश्न आहे तो असा की, मराठी भाषेला महाराष्ट्रात सार्वत्रिक स्वरूपात व्यवहार भाषेचा दर्जा मिळण्याचा. सरकारी कामकाजात मराठीला बऱ्यापैकी प्रतिष्ठा आहे. तशी ती व्यवसाय-उद्योग-कॉर्पोरेट जगतात नाही. भाषांच्या बाबतीत असे म्हटले जाते की, एखाद्या भाषेला ज्ञानभाषा, लोकभाषा किंवा व्यवहार भाषा बनविण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली म्हणजे ती भाषा शासन-प्रशासनाची असली पाहिजे. दुसरी बाब म्हणजे व्यापार-उदिम त्या भाषेत चालला पाहिजे आणि तिसरे म्हणजे सैन्यदलात त्या भाषेचा वापर होत असला पाहिजे. मराठी यातील फक्त एक अट पूर्ण करते आणि ती म्हणजे शासन-प्रशासनातील वापराची. सैन्यदलात मराठीचा वापर व्हावा, असा विचार करण्याचे कारण नाही. पण, व्यापार-व्यवसायाची व्यवहार भाषा म्हणून तिला प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न जरूर झाला पाहिजे. त्यासाठीची पूर्वअट अशी की, मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. मराठी ही प्राथमिक स्तरावर ज्ञानभाषा आहे काय, या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी आहे. परंतु, त्यापुढे किंवा उच्च शिक्षणाच्या प्रक्रियेत तिच्याविना कुणाचे अडते काय, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे.marathi literary conferenceकितीही विद्यापीठे आणि मंडळे-महामंडळे केली तरी ती ज्ञानभाषा बनू शकत नाही. त्याची कारणे अनेक आहेत. मराठीत आजही अद्ययावत ज्ञानकोश निघत नाहीत. अद्ययावत शब्दकोश निघत नाहीत. जे छापून तयार झालेले आहेत, त्यातील बरेच जुने झाले आहेत. त्यांचे ‘अपडेशन’ अपेक्षेप्रमाणे होताना दिसत नाही. साध्या गॅझेटियर्सचे उदाहरण घ्या. इंग्रजांनी तयार केलेले गॅझेटियर्स आजही संदर्भासाठी वापरले जातात. त्यातील सर्व नोंदी स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. त्यानंतर मराठीत काही प्रमाणात गॅझेटियर्स झाले, पण त्यांचेही अद्ययावतीकरण गरजेनुसार होताना दिसत नाही. या साऱ्याहून पुढचा आणि सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे तो ज्ञानभाषा बनण्यासाठी अन्य भाषांतील ज्ञान मराठीत येण्याचा. त्या बाबतीत सगळाच आनंदी-आनंद आहे. किमान एका शाखेचे पूर्ण अद्ययावत ज्ञान, अगदी उच्च शिक्षणाच्या स्तरापर्यंत, मराठीतून देण्याची तयारी अद्याप झालेली नाही. आम्ही मराठीतून वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करू, हे घोषणेसाठी ठीक वाटते. प्रत्यक्षात ते करण्यात बऱ्याच अडचणी आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. पण, भाषेच्या बाबतीतील भावनिकता असा विचार करू देत नाही. या संदर्भात दोन्ही बाजूंनी अडचणी आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात एमबीबीएसचा अभ्यासक्रम मराठीतून सुरू करायचे ठरले तर त्यासाठी पाठ्यपुस्तके किंवा संदर्भग्रंथ मराठीतून उपलब्ध आहेत काय?... आणि समजा तशी ती तयार केली गेली तर मराठी माध्यमातून एमबीबीएस झालेली व्यक्ती तेलंगणा किंवा ओडिशात प्रॅक्टिस करू शकेल काय?... या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिल्याखेरीज वैद्यकीयच काय, कोणत्याच शाखेचा अभ्यासक्रम मराठीतून सुरू करण्याचा विचार करता येत नाही. या अडचणी व्यावहारिक आहेत. तेथे भावनिक उमाळा कामाचा नाही. भाबडेपणा उपयोगाचा नाही.
मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे. तिच्या साहित्य व्यवहाराला मोठी परंपरा आहे. दरवर्षी अखिल भारतीय स्तरावरील भव्य साहित्य संमेलन भरविणारी ही एकमेव भाषा. त्यामुळे ती सशक्त भाषा आहे, यात वाद नाही. ती अधिक व्यापक व्हायची असेल तर आपल्याला भाषेच्या बाबतीतील भावनिकता आणि भाबडेपणा बाजूला ठेवावा लागेल. अन्य भाषांतून येणारे शब्द सामावून घेतले जातात तेव्हा भाषा समृद्ध होते. इंग्रजीचे उदाहरण त्यासाठी नेहमीच दिले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांतील शब्द इंग्रजीने आपलेसे केलेले आहेत. वर्ष-दोन वर्षांत इंग्रजीचा अद्ययावत शब्दकोश येतो. परभाषांतील शब्द सामावून घेतो. ते परके शब्द इतके इंग्रजाळतात की त्यांच्यावरील परभाषेची छाप पूर्णपणे निघून जाते. मराठीबद्दलच्या आपल्या आस्थेत भावनिकता मोठी. त्यामुळे अन्य भाषांतील शब्दांचा वापर जरासा झाला तरी भाषा भ्रष्ट झाल्याचा किंवा होत असल्याचा कल्ला करणारे लोक आहेत. भाषा हा संस्कृतीचा अविभाज्य भाग असेल तर तो कधीही साचेबद्ध राहता कामा नये. संस्कृती ही सदैव प्रवाहित असते. तशी भाषा देखील प्रवाही असली पाहिजे. परिवर्तनशील असली पाहिजे. तिच्यात नवे शब्द आले पाहिजेत. तिच्या अभिजात कृती अन्य भाषांत गेल्या पाहिजेत आणि अन्य भाषांतील उत्तमोत्तम रचना आपल्या भाषेत आल्या पाहिजेत. वाचन संस्कृती हा यानंतरचा मुद्दा. लोक अजूनही वाचतात. पुस्तकांचे खप कमी झाले आहेत, पण लोक स्क्रीनवर वाचतात. या विषयावर वेगळे लिहिता येईल. लिहिणाèयांची आणि वाचणाèयांची संख्या नेहमीच कमी असते. शिवाय, पूर्वी पुस्तकाचे वाचन हा त्यातल्या त्यात एकमेव विरंगुळा होता. आता विरंगुळ्याची अनेक साधने आहेत. नव्या काळातील विषयांचे पुस्तक इतर भाषेतून आपल्या भाषेत अनुवादित झाले असले तरी ते आवर्जून वाचले जाते की नाही? मग मूळ मराठीतून तसे कां लिहिले जात नाही? याचे कारणही पुन्हा आपण स्वत:भोवती घालून घेतलेल्या भाषक वर्तुळाच्या व्याप्तीत दडलेले आहे.marathi literary conference एकुणात मराठी भाषेचा साहित्य व्यवहार हा त्यातील ‘स्टेकहोल्डर्स’मुळे बंदिस्त आणि मर्यादित राहिलेला आहे आणि त्यामागे आपली भाषक समज अतिशय भाबडी आणि भावनिक असणे हेच महत्त्वाचे कारण आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुपर इंटेलिजन्सच्या वाढत्या प्रभावाच्या पृष्ठभूमीवर होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यादृष्टीने मंथन, चिंतन व्हावे आणि मराठीला ज्ञानभाषा व व्यवहार भाषा बनविण्यासाठी आवश्यक तो कृती कार्यक्रम जाहीर व्हावा, हीच अपेक्षा.