धारणी,
dhulghat-forest : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अकोट विभागाच्या धुळघाट रेल्वे वन परिक्षेत्रातील बिरोटीच्या जंगलात सालईचे डिंक (सलाई का गोंद) काढताना मध्य प्रदेशच्या चार जणांना पकडल्याने एकच खळबळ उडालेली आहे. मेळघाटच्या जंगलात परप्रांतीय तस्करांचे लागेबांधे पुन्हा सिद्ध झालेले आहे.
तीन दिवसापूर्वी धारणीपासून ५० कि. मी. अंतरावरील धुळघाट रेल्वेच्या जंगलातील बिरोटी नियतक्षेत्राच्या वनखंड क्र. १२१७ च्या जंगलातील सालई झाडाच्या डिंकासह चार जणांना पकडण्यात आलेले होते. माहितीप्रमाणे सर्व आरोपी जवळच्या मध्य प्रदेशातील दातपाडी ता. खकनार (जि. बुरहानपूर) येथील असून ते नेहमी सालईचे डिंक काढून तस्करी करण्याचा व्यवसाय करत असावे, अशी दाट शक्यता आहे. एका माहितीनुसार, महाराष्ट्र शासनासह देशातील अनेक राज्य सरकारने सालई झाड कापणे, डिंकांची वाहतूक व साठवण करणे, डिंक काढणे, विक्री व खरेदी करण्यावर प्रतिबंध लावलेले आहे. सालईचे डिंक ज्वलनशील पदार्थ असून एक रसायन पण आहे. बहुविध उपयोगी सालई डिंकाला आंतरराष्ट्रीय बाजारात फार मागणी असून महाग सुद्धा आहे.
याविषयी मिळालेल्या माहितीप्रमाणे, बिरोटी जंगलाची सीमा मध्य प्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यातील खकनार वनमंडळाला लागून आहे. येथील नागरिक जलतन, इमारती लाकूड, वनोपज आणि वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी मेळघाटच्या जंगलात अपप्रवेश करत असतात. वन्य प्राण्यांचे स्थलांतर सुद्धा होत असते. ८ किलो डिंक हस्तगत करण्यात आलेला असून पुढील चौकशी रेंजर चक्रे यांच्या मार्गदर्शनात होत आहे. मध्य प्रदेशातील डिंक तस्करांकडून आधुनिक पद्धतीने सालईच्या झाडातून डिंक काढण्यात येत आहे. या पद्धतीमुळे डिंक जास्त व कमी वेळेत निघतो. मात्र, झाडांना नुकसान होऊन झाडांचे वय कमी होण्याचा धोका असतो.