नांदगाव पेठ,
rattan-india : रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पातील कामगारांना न्याय मिळावा या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन मंगळवारी अत्यंत तीव्र वळणावर पोहोचले. संतप्त कार्यकर्त्यांनी थेट रतन इंडियाची रेल्वे रोखून धरत प्रकल्पाचे चारही प्रवेशद्वार बंद केले. पोलिसांचा चारही प्रवेशद्वारावर तगडा बंदोबस्त असून संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलनाच्या दुसर्या दिवशी सुद्धा रतन इंडिया व्यवस्थापनाने कोणत्याही प्रकारची सकारात्मक चर्चा न केल्यामुळे आंदोलन कोणत्याही क्षणी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उपोषणाचे नेतृत्व करणारे भाजप नेते विवेक गुल्हाने यांची प्रकृती आंदोलनादरम्यान खालावली. सातत्याने सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांना अशक्तपणा, चक्कर येणे आदी त्रास जाणवू लागल्याने कार्यकर्त्यांमध्ये संताप अधिकच वाढला. कामगारांच्या हक्कांसाठी आम्ही माघार घेणार नाही, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, आंदोलनस्थळी आ. राजेश वानखडे यांनी भेट देत उपोषणकर्त्यांना धीर दिला. त्यांनी रतन इंडिया व्यवस्थापनाच्या बेजबाबदार आणि कामगार विरोधी भूमिकेचा समाचार घेतला. विवेक गुल्हाने यांनी कामगारांच्या हक्कासाठी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत त्यांनी कामगारांच्या मागण्यांबाबत रतन इंडियाने तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा भाजप अधिक तीव्र आंदोलन करेल असा इशाराही आ. वानखडे यांनी दिला.
रतन इंडियाच्या एका शिष्टमंडळाने आ. राजेश वानखडे यांच्या उपस्थितीत विवेक गुल्हाने व अन्य उपोषणकर्त्यांची भेट घेतली व आंदोलन मागे घेण्याबाबत विंनंती केली. मात्र, प्रकल्पप्रमुख यांनी लेखी आश्वासन देण्यावर उपोषणकर्ते ठाम राहले त्यामुळे आजची चर्चा निष्फळ ठरली असून मंगळवारी सकाळपासून आ. वानखडे हे उपोषण मंडपात तळ ठोकून बसले होते. या आंदोलनाला परिसरातील वाघोली व डवरगाव येथील त्रस्त नागरिकांनीही पाठिंबा दर्शवत उपोषणस्थळी उपस्थिती लावली. स्थानिक नागरिकांच्या मते, प्रकल्पामुळे रोजगाराच्या नावाखाली आमच्या मुलांना अन्याय सहन करावा लागत असून दुसरीकडे वाघोली गावात रतन इंडियाच्या उडणार्या राखेमुळे नागरिकांचे जीवन हैराण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
//आंदोलन तीव्र होणार
रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाला कोळसा पुरवठा करणारी रेल्वे दिवसभर उभीच राहिल्याने कोळसा वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. त्यामुळे रतन इंडियाला तासाला लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा भाजप तिवसा शहर अध्यक्ष अजय गुल्हाने,तालुका युवा मोर्चा अध्यक्ष विजय भुयार, तालुका सरचिटणीस ऋषिकेश चांगोले,किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष नितीन काळे, मिलिंद पाटील, आकाश गुल्हाने, अनिकेत बारोटकर, सचिन हटवार, प्रतीक नंदनवार यांनी दिला.