कराकस,
Drone activity in Caracas व्हेनेझुएलामधील राजकीय अस्थिरतेत आणखी एक गंभीर वळण आले असून राष्ट्राध्यक्षांच्या अटकेनंतर राजधानी कराकसमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रपती राजवाड्याच्या परिसरात अचानक जोरदार गोळीबार सुरू झाल्याने संपूर्ण शहर हादरून गेले. या दरम्यान आकाशात ड्रोन किंवा विमानांसारख्या हवाई हालचालींचे आवाज ऐकू आल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती राजवाड्याच्या वरून संशयास्पद ड्रोन उडताना दिसल्यानंतर सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई करत गोळीबार केला. काही काळ तणावाचे वातावरण असले तरी परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र या घटनेने देशातील अस्थिरता अधिकच तीव्र झाल्याचे चित्र आहे. या घडामोडीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष अमेरिकेकडे वळले. मात्र व्हाईट हाऊसने तात्काळ निवेदन जारी करत या गोळीबार किंवा हवाई हालचालींमध्ये अमेरिकेचा कोणताही सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेने या घटनेपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी संशय आणि चर्चांना उधाण आले आहे.
३ जानेवारी रोजी ‘ऑपरेशन अॅब्सोल्युट रिझोल्व’ अंतर्गत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर देशातील परिस्थिती झपाट्याने बिघडली. सध्या मादुरो न्यूयॉर्कमधील कारागृहात असून त्यांच्या अटकेनंतर डेल्सी रॉड्रिग्ज यांनी व्हेनेझुएलाच्या अंतरिम राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, मादुरो यांच्या अटकेसाठी करण्यात आलेल्या अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर देशभरात हिंसाचाराचे सत्र सुरू झाले आहे. आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार, या संघर्षात आतापर्यंत किमान ८० जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे. मृतांमध्ये राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले राष्ट्रपती गार्डचे सैनिक तसेच अमेरिकेच्या विशेष दलांच्या कारवाईला विरोध करणारे व्हेनेझुएलाच्या लष्करातील जवान मोठ्या संख्येने आहेत.