टोकियो,
earthquake in Japan जपानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले असून या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी जपानच्या शिमाने प्रांतात भूकंप झाला असल्याची माहिती जपान हवामान संस्थेने दिली. सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ इतकी नोंदवण्यात आली होती, मात्र पुढील तपासणीनंतर ती सुधारून ४.५ इतकी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या भूकंपाचे केंद्र शिमाने प्रांताच्या पूर्व भागात असल्याचे सांगण्यात आले असून सुदैवाने त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
दरम्यान, भूकंपाच्या तीव्रतेबाबत वेगवेगळ्या संस्थांकडून भिन्न आकडे समोर आले आहेत. अमेरिकेच्या यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने (USGS) जारी केलेल्या रिअल-टाइम माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ५.८ इतकी नोंदवण्यात आली आहे. स्थानिक प्रसारमाध्यम एनएचकेच्या वृत्तानुसार, जपानच्या १ ते ७ या भूकंपीय मापन पद्धतीनुसार शिमाने प्रांतात भूकंपाची तीव्रता ५ पेक्षा अधिक असल्याचे जाणवले.
याआधी ३१ डिसेंबर रोजीही जपानला जोरदार भूकंपाचा सामना करावा लागला होता. त्या वेळी जपानच्या पूर्व नोडा प्रदेशाच्या किनाऱ्याजवळ ६.० तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपाचे केंद्र सुमारे १९.३ किलोमीटर खोलवर असल्याचे सांगण्यात आले होते. भूकंपाच्या या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे जपानमध्ये चिंतेचे वातावरण आहे, कारण देश अजूनही २०११ मधील भीषण भूकंप आणि त्सुनामीच्या जखमा विसरलेला नाही. त्या दुर्घटनेत ९.० तीव्रतेच्या भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीमुळे सुमारे १८,५०० लोकांचा मृत्यू झाला किंवा ते बेपत्ता झाले होते.