नवी दिल्ली,
Fire breaks out in Delhi Metro staff quarters दिल्लीतील आदर्श नगर परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मजलिस पार्क मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या दिल्ली मेट्रोच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत भीषण आग लागली असून या आगीत पती, पत्नी आणि त्यांच्या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तिघांचेही मृतदेह घरात जळालेल्या अवस्थेत आढळून आले, त्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
अग्निशमन विभागाला पहाटे २.३९ वाजता डीएमआरसी क्वार्टर्समधील एका घरात आग लागल्याची माहिती मिळाली. तातडीने सहा अग्निशमन वाहनांना घटनास्थळी पाठवण्यात आले. पाचव्या मजल्यावरील या घरातून आगीचे मोठे लोळ उठत होते. आग आटोक्यात आणल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना घरात तीन मृतदेह आढळले, जे पूर्णपणे जळालेले होते.
मृतांची ओळख ४२ वर्षीय अजय, ३८ वर्षीय नीलम आणि त्यांची १० वर्षांची मुलगी जान्हवी अशी झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण इमारतीत एकच खळबळ उडाली. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शॉर्ट सर्किट की अन्य कोणते कारण, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दिल्ली मेट्रोच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत घडलेल्या या दुर्घटनेने सुरक्षेच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एका सुखी कुटुंबाचा असा अंत झाल्याने परिसरातील नागरिक आणि सहकारी कर्मचारी हळहळ व्यक्त करत आहेत.