गोंदिया,
gondia-news : देवरी तालुक्यातील मुल्ला (हेटी) येथे रविवार, ४ जानेवारी रोजी रानडुक्कराची शिकार करून त्याचे मांस विक्री करणार्या सहा आरोपींना देवरी उत्तर वनपरिक्षेत्र विभागाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून शिजविलेले मांस व शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले. कुंताबाई मोहपत राऊत, रवींद्र परसराम भुते, विजय कमल वाघाडे तिन्ही रा.मुल्ला/हेटी तर जितेंद्र पुंगडे, विजय झिंगर मडावी, हेमराज कुंभरे तिन्ही रा. बोरकन्हार ता.आमगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत.

वन विभागाच्या माहितीनुसार, ४ जानेवारी रोजी मुल्ला येथील कुंताबाई राऊत यांच्या घरी वन्य प्राण्यांचे मांस असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच उत्तर देवरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. थोटे, मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग पथकाने कुंताबाई राऊत यांचे घर गाठले. तेथे रानडुक्कराचे शिजलेले मांस आढळले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी रवींद्र भुते व विजय वाघाडे यांच्या घरी देखील मांस असल्याची माहिती दिली. त्यावरून तपास केला असता रवींद्र भुते यांच्या घरी एक किलो मांस व विजय वाघाडे यांच्या घरी दीड किलो रानडुक्कराचे मांस शिजताना आढळले. दोघांची चौकशी केली असता त्यांनी जितेंद्र पुंगळे याने रानडुक्कराचे मांस आणून दिल्याचे सांगितले.
दरम्यान, वन पथकाने जितेंद्र पुंगडे यांच्या घरी धडकले असता त्याने विजय झिंगर मडावी व खेमराज कुंभरे यांची नावे सांगितले. तपासादरम्यान दोघांनी शेतात विद्युत तारांच्या सहाय्याने रानडुक्कराची शिकार करून मांस विक्री केले असे कबुली दिली. वनविभागाने आरोपींना ताब्यात घेऊन त्यांयावर भारतीय वन्य संरक्षण १९७२ चे कलम ९,३९,४८,५१ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच शिकारीसाठी वापरलेल्या बांबूच्या खोट्या, मटन कापण्याचे साहित्य, कुर्हाड ताब्यात घेतली. याप्रकरणी काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी उत्तर देवरी एस. व्ही. थोटे/मिश्रा, वनपाल डी. डी. मेश्राम, वनपाल विजय कागदीमेश्राम, एस. टी. बमनावत, वनरक्षक, एस. यू. चव्हाण, एस. सी. गायकवाड, काटेवार, प्रधान, मुसळे, मंगेश फुंडे, वनपाल हत्तीमारे, नेवारे, नंदेश्वर यांनी केली.