गोंदिया ७ अंश सेल्सिअस: विदर्भात सर्वाधिक थंड

06 Jan 2026 19:14:38
गोंदिया, 
gondia-weather : गत महिनाभरापासून शहरासह जिल्ह्याच्या तापमानात तढ-उतार पहावयास मिळत आहे. गत महिन्यात यंदाच्या मोसमातील निच्चांकी तापमान ८ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते. तर आज, ६ जानेवारी रोजी जिल्ह्याचे किमान तापमान ७ अंश नोंदले गेले, जे यंदाच्या मोसमातील सर्वात कमी आहे. आता पुन्हा कडाक्याच्या थंडीने जोर धरला आहे. वातावरणात सकाळी धुक्याची चादर पसरल्याचे चित्र नजरेस पडते. थंडीने चांगलाच जोर पकडल्याने नागरिकांना गरम कपडे घालूनच बाहेर पडावे लागत आहे. शहरासह ग्रामीण भागात शेकोट्यांजवळ नागरिक ऊब घेतानाचे चित्र आहे.
 
 

gondia 
 
यंदा पावसाळा लांबल्यामुळे थंडीला उशिराने सुरवात झाली. ढगाळी वातावरण निवळल्यानंतर नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात जिल्ह्यात बोचर्‍या थंडीला सुरवात झाली. १९ डिसेंबर रोजी यंदाच्या मोसमातील सर्वात कमी ८ अंश तापमान नोंदण्यात आला होता. त्यानंतर आज मंगळवार ६ जानेवारी रोजी ७ अंश किमान तापमानाची नोंद झाली. यानंतर आजचे कमी तापमान नागपूरचे ७.६ अंश तर वर्धाचे तापमान ८.४ अंश राहिले. देशाच्या उत्तर भागात सुरू असलेले हिमपात व वाहणारे थंड वारे यामुळे सर्वत्र शितलहर पसरली असल्याचे हवामान विभागाच्या सुत्रांनी सांगीतले. गारठणार्‍या थंडीमुळे थंडीप्रेमी हिवाळ्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. तर लहान मुले व वृद्धांसह सर्वसामान्यांना मात्र थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीचा जोर वाढल्याने शहरातील बाजारपेठेत रात्री ८ नंतर शुकशुकाट पहावयास मिळते. ग्रामीण भागात संध्याकाळी रस्ते, गावातील गल्ल्या निर्मनुुष्य होत आहेत. या बोचर्‍या थंडीमुळे नागरिक घराबाहेर जाणे टाळत आहेत. सकाळी फिरणार्‍यांची संख्याही रोडावली आहे. लोक शेकोटीचा आधार घेतानाचे चित्र आहे. थंडीचा जोर वाढल्याने सर्दी, खोकला व तापाचे रूग्ण निघू लागले आहेत. थंडीचा सर्वाधिक त्रास वृद्धांना व दमाग्रस्तांना होतो आहे. त्यांनी अधिक खबदारी घेण्याचा सल्ला चिकीत्सक देत आहेत.
 
 
विदर्भातील जिल्ह्यातील ६ जानेवारीचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
 
 
जिल्हा - किमान तापमान
 
अकोला १२.५
अमरावती ९.२
भंडारा १०
बुलढाणा १५
चंद्रपूर १२.५
गडचिरोली ११.२
गोंदिया ७
नागपूर ७.६
वर्धा ८.४
वासीम ११.८
यवतमाळ १५
Powered By Sangraha 9.0