सिडनी,
Head's century-making performance सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने केलेली कामगिरी अॅशेसच्या इतिहासात विशेष ठरली आहे. सुरू असलेल्या अॅशेस कसोटी मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात हेडने दमदार फलंदाजी करत शतक झळकावले आणि ऑस्ट्रेलियाला मजबूत स्थितीत नेऊन ठेवले. अवघ्या १०५ चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. या शतकासह ट्रॅव्हिस हेडने चालू अॅशेस मालिकेत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. नऊ डावांमध्ये तीन शतके झळकावणारा तो गेल्या २३ वर्षांतील पहिला ऑस्ट्रेलियन सलामीवीर ठरला आहे. याआधी २००२-०३ च्या अॅशेस मालिकेत मॅथ्यू हेडनने अशी कामगिरी केली होती. सिडनी कसोटीत झळकावलेले हे हेडच्या कसोटी कारकिर्दीतील बारावे शतक असून या मैदानावरचे त्याचे पहिलेच शतक ठरले आहे.

या मालिकेत ट्रॅव्हिस हेडची फलंदाजी सातत्यपूर्ण आणि आक्रमक राहिली आहे. सध्याच्या अॅशेसमध्ये त्याने ५०० हून अधिक धावा पूर्ण केल्या असून २१व्या शतकात एका अॅशेस मालिकेत ५०० पेक्षा जास्त धावा करणारा तो दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. याआधी हा पराक्रम डेव्हिड वॉर्नरने २०१३-१४ अॅशेस मालिकेत केला होता. २०२५-२६ च्या अॅशेसमध्ये हेडने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन फलंदाजीची परंपरा जिवंत ठेवली आहे. सामन्याचा विचार करता, इंग्लंडने पहिल्या डावात ३४८ धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियन संघाने आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी सुरू ठेवली आहे. ट्रॅव्हिस हेड सध्या १५० धावांपर्यंत मजल मारत शानदार फॉर्ममध्ये आहे आणि त्याला अनुभवी स्टीव्ह स्मिथची भक्कम साथ लाभत आहे. याआधी मार्नस लाबुशेनने पहिल्या डावात ४६ धावांचे योगदान दिले होते. आता ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात किती मोठी आघाडी घेतो, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.