१० जानेवारीला गुरू येणार पृथ्वीजवळ

06 Jan 2026 21:51:03
अमरावती, 
jupiter-will-come-close-to-earth : आपल्या सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु हा १० जानेवारीला अगदी सूर्यासमोर येत आहे. या घटनेला खगोलशास्त्रात ‘प्रतियुती’ असे म्हणतात या दिवशी गुरु सूर्य आमने-सामने राहील. प्रतियुतीच्या काळात ग्रहाचे पृथ्वीपासूनचे अंतर हे सरासरी कमी असते. त्यामुळे खगोल अभ्यासकांना व जिज्ञासुंना गुरुचे निरीक्षण व अभ्यास करण्याची ही एक चांगली संधी असते.
 
 
k
 
गुरुच्या लागोपाठ प्रतियुतीमधील काळ हा साधारण तेरा महिन्यांचा असतो. या आधी ७ नोव्हेंबर २०२४ रोजी गुरु-सूर्य प्रतियुती झाली होती. पृथ्वीपासून गुरूचे सरासरी अंतर हे ९३ कोटी किमी आहे. गुरुचा व्यास १, ४२, ८०० किमी आहे. या ग्रहाला सूर्याभोवती एक चक्कर मारण्यास ११.८६ वर्ष लागतात. गुरुला एकूण ७९ चंद्र आहे. टेलीस्कोपमधून गुरुचे निरीक्षण केले असता गुरुवरचा पट्टा व ४ चंद्र दिसतात. ७ डिसेंबर १९९५ रोजी मानवरहित यान ‘गॅलिलीओ’ गुरुवर पोहचले. गुरुवर जीवसृष्टी असल्याचा कोणताही पुरावा अजूनपर्यंत मिळाला नाही.
 
 
पृथ्वीपेक्षा गुरु हा ११.२५ पट मोठा आहे. रक्तरंगी ठिपका हे एक गुरुचे खास वैशिष्ट्य आहे. ‘ग्रेट रेड स्पॉट’ या नावाने हा ठिपका ओळखला जातो. हा ठिपका ४० हजार किमी लांब आणि १४ हजार किमी रुंदीचा अवाढव्य आकाराचा आहे. या ठिपक्यात पृथ्वीसारखे ३ ग्रह एकापुढे एक ठेवता येतील. न्यूटनच्या काळापासून म्हणजे जवळजवळ ३०० वर्ष हा ठिपका खगोल शास्त्रज्ञ पाहत आले आहे. या ठिपक्याचे निरीक्षण केले असता ते एक प्रचंड चक्रीवादळ असल्याचे सहज लक्षात येईल. गुरुवर सतत घोंगावणारे चक्रीवादळ एका विशिष्ट ठिकाणीच का निर्माण झाले याचे कारण मात्र अजूनही अज्ञात आहे.
 
 
१० जानेवारी रोजी सूर्यास्तानंतर थोड्याच वेळात गुरू ग्रह पूर्व क्षितीजावर उगवेल आणि पहाटे पश्चिमेकडे मावळेल. हा ग्रह अत्यंत तेजस्वी दिसत असल्याने तो सहज ओळखता येईल व साध्या डोळ्याने पाहता येईल. परंतु गुरुवरचा ग्रेट रेड स्पॉट व युरोपा, गॅनीमीड, आयो व कॅलेस्टो हे गुरुचे चार चंद्र साध्या डोळ्याने दिसू शकणार नाही. या करिता टेलिस्कोपची आवश्यकता आहे, अशी माहिती मराठी विज्ञान परिषद, अमरावती विभागाचे हौशी खगोल अभ्यासक विजय म. गिरुळकर व प्रवीण गुल्हाने यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0