नागपूर,
state-childrens-theatre-festival : मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि मूल्यशिक्षणासाठी बालनाट्य हे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे चित्र महाराष्ट्र राज्य बालनाट्य महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक ६ जानेवारी रोजी दिसून आले. वसंतराव नाईक स्मृती सभागृह, वनामती येथे सुरू असलेल्या २२व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत मंगळवारी सात बालनाट्यांचे सादरीकरण झाले. रंगमंचावर सादर होणाऱ्या कथानकांतून स्वच्छता, परिश्रम, नातेसंबंध, सहकार्य, इतिहास, सामाजिक वास्तव आणि संवेदनशीलता यांचे संस्कार मुलांपर्यंत सहजपणे पोहोचले.

स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारे ‘तथास्तु’ या नाटकाने शिस्त व स्वच्छतेशिवाय यश अपूर्ण असल्याचा संदेश दिला. भावंडांमधील नात्यांची ओल दाखवणारे ‘थेंब थेंब श्वास’ प्रेक्षकांना भावनिक पातळीवर भिडले. अभ्यास व परिश्रमाशिवाय यश नाही, हे ठसवणारे ‘ठोंब्या ठोंबीची गोष्ट’ मुलांसाठी प्रेरणादायी ठरले. परस्पर सहकार्याचे महत्त्व सांगणारे ‘सुपरहिरो’ या बालनाट्यातून ‘समूहशक्ती’ची जाणीव करून देण्यात आली. खेळातून इतिहास उलगडणारे ‘स्वराज्योदय’ हे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, शौर्य आणि रयतेचे राज्य या संकल्पना प्रभावीपणे मांडते. सामाजिक वास्तवाची जाण देणारे ‘कणा’ पालकांच्या कष्टांची जाणीव करून देणारे ठरले. तर अनाथ मुलांच्या भावना आणि संघर्ष उलगडणारे ‘खेळ विचारांचा’ हे बालनाट्य प्रेक्षकांना अंतर्मुख करून गेले.
प्रत्येक सादरीकरणाला शालेय मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अभिनय, नेपथ्य, संगीत आणि प्रकाशयोजनेच्या माध्यमातून या बालनाट्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर जीवनमूल्यांचे संस्कारही घडवले. बालमन घडवणाऱ्या या रंगमंचीय प्रवासाने महोत्सवाचा दुसरा दिवस संस्मरणीय ठरला.