एआयचा किती वापर करायचा हे पत्रकारांना ठरवावे लागणार : नितीन पखाले

06 Jan 2026 22:02:57
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
nitin-pakhale : एआयमुळे पत्रकारिता सोपी झाली. मात्र ही कृत्रिम बुद्धीमत्ता पुढील काळात पत्रकारितेपुढे मोठे आव्हान निर्माण करण्याचा धोका आहे. यामुळे काम सोपे होईल पण विचार क्षमता खुंटेल. यामुळे एआयचा किती वापर करायचा हे आपल्याला ठरवावे लागणार आहे. त्यासाठी आपण आतापासूनच सजग होण्याची आवश्यकता असल्याचे मत जेष्ठ पत्रकार नितीन पखाले यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र राज्य श्रमिक पत्रकार संघाशी संलग्नित यवतमाळ शाखेने आयोजित केलेल्या पत्रकारदिनाच्या कार्यक्रमात मुख्य अतीथी म्हणून बोलत होते.
 
 
y6Jan-Patrakaar
 
यवतमाळमधील केमिस्ट भवनात पत्रकार दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार आरती गंधे, मुख्य अतिथी म्हणून तहसीलदार योगेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे, पत्रकार भास्कर मेहरे, श्रमिकचे अध्यक्ष श्रीकांत राऊत, सचिव अमोल ढोणे होते. नितीन पखाले पुढे बोलताना म्हणाले, एआय आज सोपे वाटत असल्याने त्याचा उपयोग वाढला आहे. मात्र यातून बुद्धीमत्ता खुंटण्याचा धोका आहे. तो आपण वेळीच ओळखला पाहिजे. पत्रकारांनी चौकस दृष्टी ठेवली पाहीजे, सर्व निरीक्षण नोंदविली पाहिजे, विचारांना धार असली पाहिजे, एआयचा किती वापर करायचा हे आपण ठरविले पाहिजे, असे ते म्हणाले.
यवतमाळातील पत्रकार भवनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळत आहे. त्यासाठी सर्वांनी सांघिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सरकार अनुकूल आहे. मुंबई, पुण्यात पत्रकार भवन आहे. पुढील वर्षीतरी ईमारतीचे काम होईल या दृष्टीने प्रयत्न करायला हवे. असे मत त्यांनी नोंदविले.
 
 
 
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना आरती गंधे यांनी यवतमाळातील पत्रकारीता करताना सर्वांचेच योगदान मोलाचे आहे. महिला पत्रकार असले तरी अधिकारी वर्ग आणि गाव पातळीवरील रिपोर्टींग करताना कुठल्याही अडचणी आल्या नाहीत, असे मत व्यक्त केले. तहसीलदार योगेश देशमुख म्हणाले, पत्रकारांनी समाजापर्यंत खरी माहिती द्यावी, अनेक वेळा संयमी पत्रकारीता आवश्यक असते. सामाजिक कार्यात पत्रकारांचा सहभाग असतो. तो असाच कायम असायला हवा, असे ते म्हणाले. सतीश चवरे म्हणाले, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार आहे. आपल्याकडून प्रश्न येणे अपेक्षित आहे. जनतेचे प्रश्न मांडायला हवे असे ते म्हणाले. भास्कर मेहरे यांनी पत्रकारांचा एकोपा कायम राहू द्या, असे आवाहन केले. श्रीकांत राऊत यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. संचालन केशव सवळकर यांनी केले. तर आभार अमोल ढोणे यांनी मानले.
 
 
 
यावेळी गणेश बयास, लक्ष्मणलाल खत्री, दिनेश गंधे, अशोक गोडंबे, किशोर जुनूनकर, नागेश गोरख, राजकुमार भितकर, आनंद कसंबे, बल्लू भागवते, वीरेंद्र चौबे, अशोक बानोरे, गणेश राऊत, सुरेंद्र राऊत, चेतन देशमुख, निलेश फाळके, प्रविण देशमुख, संजय सावरकर, अमोल शिंदे, समीर मगरे, रुपेश उत्तरवार, श्याम वाढई, पवन लताड, मयूर वानखेडे, अनिकेत कावळे, विवेक गोगटे, सतीश बाळबुधे, तुषार देशमुख, मयुरेश शर्मा, रवी राऊत, विजय बुंदेला, राहुल पाटील, राहुल वासनिक, नितीन राऊत, अतुल राऊत, नितीन भुसरेड्डी, मकसुद अली, किरण कोरडे, विजय मालखेडे, शाकीर अहेमद, रुपेश चाफलकर, विजय गाडगे, हेमराज बंड उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0